Ratnagiri News: शेट्येनगरातील भीषण स्फोट: मृत्युमुखी मायलेकींना दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:33 PM2023-01-20T18:33:45+5:302023-01-20T18:34:34+5:30
मायलेकीचा झोपेतच अंत झाला
रत्नागिरी : शहरातील शेट्येनगर येथील भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकी, कनिज काझी आणि नुरुन्निसा अलजी यांच्यावर मजगाव येथील कब्रस्थान येथे बुधवारी रात्री साडे नऊ वाजता दफनविधी करण्यात आला.
स्फोटात अशफाक काझी भीषण भाजले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आले आहे. काझी यांच्या पत्नी कनिज व सासू नुरुन्निसा या झोपलेल्या असल्याने त्यांच्या अंगावर इमारतीचा स्लॅब कोसळल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. ढिगारा बाजूला काढून मृतदेह बाहेर काढल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
अशफाक यांचा मोठा मुलगा अरबाज नोकरीसाठी मुंबईत असतो. या दुर्घटनेची माहिती मिळताच तो तातडीने रत्नागिरीत आला. त्याने मृतदेह ताब्यात घेतले. मजगाव येथे अबरारचे आजोळ असून तेथे मामा, मावशी राहत असल्याने मृतदेह तेथे नेण्यात आले. रात्री साडे नऊ वाजता साश्रू नयनांनी दफनविधी करण्यात आला.
अश्रू अनावर
सिलिंडरचा स्फोट झाला असून, बाबा भाजले आहे, एवढीच माहिती फोनवर मिळाली. मात्र, इकडे पोहोचल्यानंतरच चित्र काही वेगळेच होते. रात्री आई माझ्याशी शेवटची बोलली. माझ्या व अम्मारच्या शिक्षणासाठी तिने खूप कष्ट घेतले होते. आई, आजीबरोबर ज्या घरात आम्ही लहानाचे मोठे झालो, ते छत्रही राहिले नाही, असे सांगत अरबाजला अश्रू अनावर झाले. वडील व धाकट्या भावासाठी मी खंबीर होईन, एवढेच तो बोलू शकला.
मायलेकीचे प्रेम अखेरपर्यंत
मायलेकीचे नातेच दूधावरील सायीप्रमाणे घट्ट असते. कनिज यांच्या आई नुरुन्निसा सध्या लेकीकडे होत्या. दोघी मायलेकी बाजूलाच झोपल्या होत्या. झोपेतच त्यांचा अंत झाला. झोपेत दुर्घटनेची जाणीव कदाचित कनिज यांना झाली असावी, म्हणून त्यांनी आईला काही होऊ नये, अशा धास्तीने आईच्या पोटावर हात ठेवला होता. हा हात अखेरपर्यंत आईच्या पोटावर होता. मृतदेह ढिगाऱ्याखालून काढतानाचे ते चित्र गलबलून टाकणारे होते.