परीक्षेचा निकाल रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:35+5:302021-07-08T04:21:35+5:30
देवरुख : सार्वजनिक आरोग्य विभागाने ५० टक्के पदभरतीची परीक्षा कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरू असताना घेतली होती. मात्र चार महिने ...
देवरुख : सार्वजनिक आरोग्य विभागाने ५० टक्के पदभरतीची परीक्षा कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरू असताना घेतली होती. मात्र चार महिने होऊन गेले तरीही याचा निकाल अजूनही लागलेला नाही. ग्रामविकास विभाग अंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे निकाल कधी लागणार आणि पदभरती कधी होणार, याची प्रतीक्षा सुरू आहे.
उमेश मोहिते यांना पुरस्कार
रत्नागिरी : गोंदिया येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेत रत्नागिरीतील उमेश मोहिते यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ‘नारीशक्तीला सलाम’ या कवितेची निवड करण्यात आली आहे.
विहिरीची स्वच्छता
देवरुख : नगरपंचायत क्षेत्रातील परशराम वाडीमधील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे जतन केले आहे. परिसरातील झाडांचा पालापाचोळा विहिरीत पडल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. परंतु या वाडीतील विद्यार्थ्यांनी या विहिरीची स्वच्छता केली आहे.
ऊन - पावसाचा खेळ
रत्नागिरी : सध्या पावसाचा श्रावण महिन्याप्रमाणे ऊन - पावसाचा खेळ सुरू झाला आहे. या आठवड्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील लावण्यांची कामे रखडली आहेत. ९ जुलैनंतर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत असल्याने आता शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.
रस्त्याशेजारी चिखल
रत्नागिरी : शहरात रस्त्यालगत चर खणल्याने पावसाळ्यात या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. शहरातील मारुती मंदिर ते माळनाका भागात मुख्य रस्त्याच्या शेजारी चर खणून ते थातूरमातूररीत्या भरण्यात आले आहेत. पावसाळ्यात या चरांमध्ये पाणी भरल्याने रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दुकानांसमोर तीच स्थिती असल्याने नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.