पाठ्यपुस्तकांची रद्दी कवडीमोलाने
By admin | Published: April 12, 2017 03:41 PM2017-04-12T15:41:43+5:302017-04-12T15:41:43+5:30
कचऱ्यातून पोटाची खळगी भरतात, रद्दीचा व्यवसाय तेजीत, पाठ्यपुस्तके ५ ते ६ रुपये किलोने विक्री
आॅनलाईन लोकमत
रहिम दलाल/ रत्नागिरी, दि. १२
विद्येचे आचरण करुन आयुष्य घडविणारी पाठ्यपुस्तके, वह्या शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची रद्दी कवडीच्या भावात विकली जात आहेत. त्यासाठी घरोघरी रद्दीवाले फिरत असून त्यांचा धंदा सध्या तेजीत चालला आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी कचऱ्यातून पैशाची कमाई केली जाते. या पोटासाठी झोपडपट्टी राहणारी अनेक कुटुंबीय कचऱ्यावर आपले जीवन जगत आहेत. त्यासाठी अनेक महिला व पुरुष पहाटे उठून कचराकुंड्या तसेच रस्त्यावर पडलेली रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशवा, पुठे्ठे साठवून त्याची विक्री करतात. त्यावरच शेकडो कुटुंबीयांची गुजराण केली जात आहे.
झोपडपट्टीशिवाय उच्चभू वस्तीत राहणारेही भंगारातून मोठी कमाई करीत आहेत. शहर परिसरातून कचरातून साठवून आणलेले प्लस्टिक पिशव्या, बाटल्या, पुठ्ठे विकत घेऊन ते मुंबई व अन्य बड्या शहरातील कारखान्यांमध्ये पाठविण्यात येतात. त्यामुळे लाखोंची कमाई करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काबाडकष्ट करण्यास ही मंडळी मागे पहात नाहीत, हे विशेष आहे.
मुलांच्या परिक्षा आटोपल्याने अनेक पालक त्यांची पुस्तके, वह्या घरात साठवून न ठेवता ती रद्दी म्हणून काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील हजारो रुपये किंमतीची पाठ्यपुस्तके, वह्या किरकोळ किंमतीत किलोवर विकले जात आहेत. पाच ते सहा रुपये किलो भावाने ही रद्दी विकण्यात येत आहे. त्यासाठी झोपडपट्टीत राहणारे पुरुष, महिला शहरातील कॉलनी, वाड्यांमध्ये सायकलवरुन फिरुन रद्दी गोळा करीत आहेत. वर्षभर पावसाच्या पाण्यापासून जपून, तसेच अन्य कारणाने ती खराब होण्यापासून आपल्या जीवा पलिकडे वापरण्यात येणारी पाठ्यपुस्तके, वह्या अगदी रद्दीच्या भावात विकली जात आहेत. त्यातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे रद्दी खरेदीचा व्यवसायाला सध्या तेजी आली आहे.
दहावी, बारावीनंतर बहुतांश खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपल्या असल्याने काही शाळांना सुट्टीही पडली आहे. वर्षभर जपणूक केलेली पाठ्यपुस्तके रद्दीमध्ये काढून सायकलवरुन गल्लोगल्ली फिरती करणाऱ्या रद्दी खरेदी करणाऱ्यांना कवडीमोलाने विकली जात आहेत.