काेराेनामुळे शाळांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:41+5:302021-06-09T04:38:41+5:30
रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येतात. जिल्ह्यातील १ लाख १३ ...
रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येतात. जिल्ह्यातील १ लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अद्याप शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. यावर्षीही ऑनलाईन अध्यापनच होण्याची शक्यता आहे.
गतवर्षीही कोरोनामुळे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष भरल्याच नाहीत. पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा डिसेंबरमध्ये सुरू झाल्या. विद्यार्थी घरी असल्याने पुस्तके फारशी हाताळली गेली नाहीत. त्यामुळे शासनाने गतवर्षीची पाठ्यपुस्तके परत करण्याचे आवाहन केले असले तरी जिल्ह्यातील एकाही पालकांने पाठ्यपुस्तके परत केलेली नाहीत. शिवाय शाळांना बालभारतीकडून पुस्तके प्राप्त झालेली नसून, अद्याप काही सूचनाही दिलेल्या नाहीत.
गतवर्षी कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू होते. त्यामुळे पुस्तकांचा फारसा वापर न झाल्याने अधिकाधिक पुस्तके चांगली असल्याने पुन्हा वापरणे शक्य असल्यानेच शासनाने पाठ्यपुस्तके परत करण्याचे आवाहन केले होते. पाठ्यपुस्तके परत केली तर जुनी पाठ्यपुस्तके वापरता येऊ शकतात. त्यामुळे पुस्तकांवरील शासनाचा खर्च वाचणार आहे. मात्र, पालकांनी पुस्तके अद्याप परत केलेली नाहीत. कोरोनाचे शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुस्तके परत करण्याकडे पालकांचा निरूत्साह आहे. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे दि. १५ जूनला प्रत्यक्ष शाळा सुरू होणे अशक्य आहे. कोरोनाचे संकट असल्याने वापरलेल्या पुस्तकांबाबत धोका पत्करण्याची कोणाचीच तयारी नाही.
राज्य शासनाने अनलॉकची घोषणा केली असून, टप्प्याटप्प्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनलॉक होणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे संकट असल्याने शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ऑनलाईन अध्यापनाबाबतही काहीच सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळांनाही शासनाकडून सूचनांची प्रतीक्षा आहे.
--------------------------
शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्याप तरी कोणत्याही सूचना प्राप्त नाहीत. कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापनालाच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुलांसाठी पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली असून, पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. शासनाकडून आलेल्या सूचना शाळांना पाठविण्यात येणार आहेत.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.