'त्या' बांग्लादेशींचे भारतात १० वर्षाहून अधिक वास्तव्य, २ वर्ष मुंबईतही!
By संदीप बांद्रे | Published: October 6, 2023 02:45 PM2023-10-06T14:45:00+5:302023-10-06T14:45:18+5:30
खेर्डीत ८ वर्षे वास्तव्य, कुटुंबात ११ सदस्यांचा समावेश
संदीप बांद्रे, चिपळूण: बांग्लादेशातून भारतात अवैधरित्या खूसघोरी केलेल्या तिघांना चिपळूण पोलिसांनी खेर्डी येथून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे देखील हे कुटुंब वास्तव्याला होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या मदतीने तपास केला जात आहे. हे कुटुंब भारतात गेल्या १० वर्षापासून वास्तव्याला आहे. त्यांच्या कुटुंबात ११ सदस्यांचा समावेश आहे.
दोन दिवसांपुर्वी खेर्डी येथून गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांग्लादेश) या तिघांना रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची चिपळूण पोलिसांनी कसून चौकशी केली असतानाच ते खेर्डी येथे राहण्यापुर्वी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दोन अडीच वर्षे वास्तव्याला होते. त्यानंतर खेर्डी मोहल्ला येथे गेल्या सात आठ वर्षापासून ते वास्तव्याला आहेत. तीन खोल्यांमध्ये हे कुटुंब वास्तव्य करीत आहे. त्यांच्या कुटुंबात महिला व मुलांसह ११ जणांचा समावेश आहे.
खेर्डी येथे मुल्ला हे कुटुंब बांधकाम क्षेत्रात सेंट्रींगची कामे करतात. पुर्ण कुटुंब या कामात आहेत. नवीन मुंबई येथे देखील हेच काम ते करत होते. त्यामुळे चिपळूण पोलिसांच्या पथकाने कोपरखैरणेसह मुंबई क्षेत्रात संबंधीत कुटुंबापैकी कोणावर गुन्हा अथवा तक्रार दाखल आहे का, तसेच ते कोणत्या मार्गाने भारतात आले, घुसखोरी कशा पद्धतीने केली. अशा अनेक प्रश्नांचा उलघडा या तपासाच्या निमीत्ताने केला जात आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून १५ हजार रूपये रोख रक्कम, प्रत्येकी ५ हजार रूपये किमतीचे विवो कंपनीचे मोबाईल, आधार कार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र जप्त केले आहे. त्यांच्याकडील या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.