प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 07:52 AM2024-10-19T07:52:08+5:302024-10-19T07:53:25+5:30
शस्त्रक्रिया करून मृत अर्भकाला बाहेर काढण्यात आले. मंडणगड येथील एका गर्भवती महिलेला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल केले होते. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरच न आल्याने महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचे विदारक चित्र समोर आले.
खेड (जि. रत्नागिरी) - रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या मातेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री घडली. या प्रकाराबाबत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, तब्बल २४ तासानंतर डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले.
शस्त्रक्रिया करून मृत अर्भकाला बाहेर काढण्यात आले. मंडणगड येथील एका गर्भवती महिलेला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल केले होते. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरच न आल्याने महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचे विदारक चित्र समोर आले.
डॉक्टरांना माहिती दिल्यानंतरही डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले नसल्याने गरोदर महिला मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकाराबाबत खेडमधील मनसेच्या काही कार्यकत्यांना कळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर डॉक्टर हजर झाले आणि त्यांनी शस्त्रक्रिया करून मृत अर्भकाला बाहेर काढले. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सगरे यांच्याशी या प्रकाराबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.
डॉक्टरांची अनेक पदे रिक्त
- मुंबई-गोवा महामार्गावर कळवणी उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.
- तेथील स्त्रीरोगतज्ज्ञा महिन्यातून चार दिवसही रुग्णालयात येत बाब समोर आली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञा येत नसल्याने ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे हाल होत आहेत.
- डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गोरगरीब महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे.