व्हेल माशाचे पिल्लू अखेर समुद्रात सोडले, पण...; शेकडो हातांनी केले शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 07:47 AM2023-11-16T07:47:48+5:302023-11-16T07:48:34+5:30

तीनही वेळा तो बाहेर आला.

The baby whale was finally released into the sea, but...; Attempts made by hundreds of hands on Ganpatipule beach failed | व्हेल माशाचे पिल्लू अखेर समुद्रात सोडले, पण...; शेकडो हातांनी केले शर्थीचे प्रयत्न

व्हेल माशाचे पिल्लू अखेर समुद्रात सोडले, पण...; शेकडो हातांनी केले शर्थीचे प्रयत्न

- संजय रामाणी

गणपतीपुळे (रत्नागिरी) : ते पाच-सहा महिन्याचे एक पिल्लू होते. पण ते देवमाशाचे (ब्ल्यू व्हेल) पिल्लू असल्याने तीस फूट लांब आणि सुमारे साडेतीन टन एवढे त्याचे वजन होते. पाच ते सहा महिन्यांचे हे पिल्लू सोमवारी सकाळी गणपतीपुळे किनाऱ्यावर आले. शेकडो हातांनी तब्बल ४२ तास प्रयत्न करून त्याला जिवंत ठेवले. ओहोटीच्यावेळी त्याच्यावर पाणी फवारण्यात आले, आठ तास सलाइन लावण्यात आले आणि ४२ तासांनी ते सुखरूप खोल समुद्रात पोहोचलेही...पण सायंकाळी किनाऱ्यावर ते मृतावस्थेत दिसून आले. एखाद्या वाइल्ड लाइफ चॅनेलवरची कथा वाटावी, अशी ही घटना रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे घडली.

तीन वेळा बाहेर...
अनेक सरकारी यंत्रणा, अनेक ग्रामस्थ, खासगी कंपन्या, पर्यटक असे शेकडो हात या मोहिमेत नि:स्वार्थ भावनेने सहभागी झाले. प्रथम एमटीडीसीचे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने त्याला समुद्रात खोलवर नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मासा पुन्हा समुद्रकिनारी लागत होता. ही बातमी पसरताच किनाऱ्यावर नागरिकांंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वाळूत अडकलेल्या माशाला सोमवारी तीनवेळा समुद्रात ढकलण्यात आले. मात्र, तीनही वेळा तो बाहेर आला.

आणि तो देवाघरी गेला...
मंगळवारी पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीमने तसेच वनविभागाने माशावर वेळीच योग्य उपचार केल्याने तो जगू शकला. रात्री ११:३० वाजता जिंदल कंपनीचे जहाज (टग) व तटरक्षक दलाच्या बोटीने या माशाला खोल समुद्रात व्यवस्थित व सुखरूप सोडण्यात आले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनची चर्चा समाजमाध्यमांवर दिवसभर सुरू होती. मात्र, संध्याकाळी सहाच्या सुमारास वाईट बातमी आली, हा मासा पुन्हा मृतावस्थेत किनाऱ्यावर आला.  

यांनी केले प्रयत्न
वनविभाग, ग्रामपंचायत गणपतीपुळे, स्थानिक पोलिस प्रशासन, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, महसूल विभाग, एमटीडीसी गणपतीपुळे, बोट क्लब गणपतीपुळे, जिंदल कंपनी, वाइल्ड लाइफ पुणे रेस्क्यू टीम तसेच असंख्य स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी बचाव मोहीमेत सहभाग घेतला. 

ओहोटीच्या वेळी पाण्याचा मारा
सायंकाळी भरतीची वेळ नसल्याने या माशाला जिवंत ठेवण्यासाठी त्याला पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने एमटीडीसी कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांनी समुद्राच्या पाण्याचा मारा करून त्याला जिवंत ठेवले.

Web Title: The baby whale was finally released into the sea, but...; Attempts made by hundreds of hands on Ganpatipule beach failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.