Uday Samant: 'ती' भाजपची जुनी पद्धतच, मंत्री उदय सामंतांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:57 PM2022-06-03T15:57:50+5:302022-06-03T15:58:20+5:30
मुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल.
रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण होत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. श्रेय कोणालाही घेऊ देत पण रत्नागिरीच्या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली.
मंत्री उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे विमानतळ लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.
अपक्षांची बैठक झाल्यानंतरच कळेल
मुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल. ती बैठक झाल्यानंतरच त्यांनी बैठक का बाेलावली आहे, हे कळेल, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
ही 'त्यांची' एक स्टाईल
विमानतळाच्या कामाकडे खासदारांचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विमानतळाचे काम नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना मी शुभेच्छा देताे. रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण हाेत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. खरंतरं मला आनंद वाटताे, मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनी रत्नागिरीकरांना दाखवून दिले आहे की, रत्नागिरी विमानतळाचे काम आता हाेणार आहे.
ही आमची जबाबदारी
खासदार विनायक राऊत यांनी चिपीचे विमानतळ सुरु करून दाखवले. रत्नागिरीच्या बाबतीत ते सकारात्मक असून, या विमानतळासाठी राज्य सरकारने १०० काेटी रुपये दिले आहेत. त्यासंदर्भातील भूसंपादनाची नाेटीस देणे, त्यासाठी बैठका घेणे हे मी स्वत: केले आहे. त्यामुळे श्रेय काेणालाही लाटू दे त्याच्याशी मला घेणदेण नाही. हा रत्नागिरीकरांच्या विकासाचा प्रश्न आहे. या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.