दापोलीच्या समुद्रात बुडालेल्या पाचगणीच्या युवकाचा मृतदेह सापडला, १६ तासांनी लागला शोध
By अरुण आडिवरेकर | Published: October 10, 2022 02:11 PM2022-10-10T14:11:34+5:302022-10-10T14:12:02+5:30
पाच जणांना वाचवण्यात यश
दापोली : तालुक्यातील कर्दे समुद्रात सहा जण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. यातील वाई (ता. सातारा) येथील पाच जणांना वाचविण्यात यश आले असून, सौरभ धावडे (रा. पाचगणी, महाबळेश्वर) हा १८ वर्षीय युवक समुद्राच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला हाोता. १६ तासांनी या युवकाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर सापडला.
कार्तिक घाडगे (२०), यश घाडगे (१९), दिनेश चव्हाण (२०), अक्षय शेलार (१९), कुणाल घाडगे (३०, सर्व रा. एकसर, ता. वाई, सातारा) आणि सौरभ धावडे हे सहा जण दापोली तालुक्यातील कर्दे येथे दुचाकी घेऊन फिरण्यासाठी आले होते. त्यांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यालगत तंबू उभारला होता. तेथे आपले साहित्य ठेवून सर्व जण पोहण्यासाठी समुद्रात गेले होते. ते समुद्रात उतरले त्यावेळी ओहोटी होती. समुद्राच्या पाण्यात आंघोळ करत असतानाच पायाखालची वाळू घसरली आणि ते समुद्रात जाऊ लागले.
त्यांनी आरडा ओरडा करताच समोरच हॉटेलमध्ये असलेल्या ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांनी दोरीसह धाव घेतली. त्यांनी दोरी समुद्रात फेकून त्यांना वाचविण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्यात पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, सौरभ धाडवे याचा हात सुटला आणि तो समुद्रात ओढला गेला. पोलिसांनी स्थानिकांसोबत उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, बेपत्ता सौरभ धावडे याचा कोठेच शोध लागला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. त्यावेळी बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
पर्यटकांना वाचविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही. कर्दे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था म्हणून लाईफ जॅकेट, दोरी, बोया हे साहित्य ठेवण्यात आले आहे. परंतु, एखादी बोट असणे गरजेचे आहे. त्यामुळे समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला वाचवणे शक्य होणार आहे. - सचिन तोडणकर, सरपंच
माशावर मारला ताव
हे सहा जण शनिवारी (८ ऑक्टोबर) दुचाकीने आले होते. रात्री त्यांनी खेड पेट्रोलपंप येथे मुक्काम केला. रविवारी सकाळी लवकर हर्णै बंदरात जाऊन त्यांनी मासे खरेदी केले. माशावर ताव मारून ते दुपारी १ च्या दरम्यान कर्दे येथे दाखल झाले. किनाऱ्यावर दुचाकी पार्क करून ते समुद्रात आंघोळीसाठी उतरले अन् समुद्रात ओढले गेले.