शहीद सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव रत्नागिरीत दाखल, जिल्हा प्रशासनाने दिली मानवंदना

By शोभना कांबळे | Published: April 3, 2023 07:31 PM2023-04-03T19:31:17+5:302023-04-03T19:31:32+5:30

उद्या मंगळवारी पार्थिव त्यांच्या मूळ गावी मोरवणे येथे नेण्यात येणार

The body of Martyr Subedar Ajay Dhagale arrived in Ratnagiri, the district administration paid tributes | शहीद सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव रत्नागिरीत दाखल, जिल्हा प्रशासनाने दिली मानवंदना

शहीद सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव रत्नागिरीत दाखल, जिल्हा प्रशासनाने दिली मानवंदना

googlenewsNext

रत्नागिरी : सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले मोरवणे (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे यांचे पार्थिव आज, सोमवारी रत्नागिरीत आणण्यात आले. येथील विमानतळावर पार्थिव आले असता जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.

भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव सोमवारी सायंकाळी रत्नागिरी विमानतळावर पोहचले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीकांत गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना  पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.

2STC मडगाव (गोवा) येथील एक ज्युनिअर ऑफीसर सुभेदार आलम व १७ जवान यांनी गार्ड ऑफ ऑनर दिले.  १०८ इंजिनिअर रेजिमेंटरचे मेजर शिवकुमार एस.एन. यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.  तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर, तटरक्षक दलाचे जवान, पोलीस विभागाचे अधिकारी, माजी सैनिकांचे प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण, मोरवणे गावातील ग्रामस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे प्रतिनिधी गणेश धुरी, पत्रकार, माजी सैनिक यांनी श्रध्दांजली वाहिली.  

विमानतळावरुन सुभेदार ढगळे यांचा पार्थिव उद्या मंगळवारी सकाळी ५.१५ वाजता त्यांच्या मूळ गावी मोरवणे येथे नेण्यात येणार आहे. चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाक्यापासून मोरवणे गावापर्यंत शहीद सुभेदार ढगळे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी गेले असता झालेल्या भुस्खलनात  शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील होते. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यासह जिल्हयात शोककळा पसरली आहे.

Web Title: The body of Martyr Subedar Ajay Dhagale arrived in Ratnagiri, the district administration paid tributes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.