'हापूस' जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट, बनवला ब्रँड ‘एक्याम’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:09 PM2022-03-25T18:09:49+5:302022-03-25T18:34:35+5:30
‘एक्याम’ची उत्पादने भारतातील प्रमुख शहरांमध्ये, विविध आकारांच्या पॅक्समध्ये उपलब्ध करवून दिली जातील. याची सुरुवात मुंबई, दिल्ली-एनसीआर व कोलकात्यापासून केली जाईल. मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पायलट लॉंचसाठी प्रयत्न केले जात असून, त्याचा शुभारंभ युरोपपासून केला जाईल.
रत्नागिरी : कोकणातील हापूस आंबा शेतकऱ्यांनी स्वीस-भारतीय खाद्य व तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म इन्नोटेरासोबत भागीदारी करत आपला ब्रँड सुरु केला आहे. ‘एक्याम’ असे या ब्रँडचे नाव आहे. संस्कृत शब्द ‘एकम’ म्हणजेच एकपासून बनलेले हे ब्रँडचे नाव एकता दर्शवते. तसेच ‘एक्याम’मध्ये (हिंदी भाषेनुसार) हापूस म्हणजे एक आम आणि त्या हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट असाही अर्थ आहे.
‘एक्याम’ ब्रँडमार्फत ग्राहकांना सर्वोत्तम फळांचा अनुभव प्रदान करण्यासाठी कोकणातील २००० पेक्षा जास्त हापूस आंबा शेतकऱ्यांनी भागीदारी केली आहे. अतिशय बारकाईने तपासणी करून निवडण्यात आलेल्या बागांमध्ये उगवण्यात आलेली फळे या ब्रँडमध्ये विकली जातात आणि या फळांची हाताळणी तसेच ती पिकवण्याचे काम एफएसएसएआयने मंजूर केलेल्या प्रक्रियांद्वारे केले जाते. ग्राहकांना शक्य तितकी सर्वोत्तम दर्जाची फळे मिळावीत, यासाठी पॅकेजिंगच्या आधी प्रत्येक फळ स्कॅन केले जाते.
‘एक्याम’मध्ये प्रत्येक फळाला एक क्यूआर कोड दिला जातो, त्यावरून ते फळ कोणत्या बागेतून आले आहे ते ग्राहकांना समजून घेता येऊ शकते. अशा प्रकारे ‘एक्याम’ ब्रँड आपल्या ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या फळांची १०० टक्के माहिती जाणून घेण्याची सुविधा प्रदान करतो.
‘एक्याम’ची उत्पादने भारतातील प्रमुख शहरांमध्ये, विविध आकारांच्या पॅक्समध्ये उपलब्ध करवून दिली जातील. याची सुरुवात मुंबई, दिल्ली-एनसीआर व कोलकात्यापासून केली जाईल. मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पायलट लॉंचसाठी प्रयत्न केले जात असून, त्याचा शुभारंभ युरोपपासून केला जाईल.
संपूर्ण कोकणातील हापूस आंबा शेतकऱ्यांना एकत्र आणणारी ही भागीदारी ऐतिहासिक आहे. रत्नागिरी, देवगड, पावस, वेंगुर्ला, केळशी आणि इतर भागांमधील को-ऑपरेटिव्हज आणि एफपीओनी या उपक्रमामध्ये इन्नोटेरासोबत भागीदारी केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या फळांचे शक्य तितके सर्वोत्तम मूल्य मिळवण्यात मदत करण्याच्या या वाटचालीत ब्रँडची सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. - मन्सूर काझी, सदस्य, पावस को-ऑपरेटिव्हचे बोर्ड.
हापूस आंबा शेतकऱ्यांसोबत ही भागीदारी इन्नोटेरा शेती-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा प्रभाव आणि वचनबद्धता दर्शवते. ब्रँड ‘एक्याम’ आधुनिक विचारांच्या आधारे विकसित करण्यात आला आहे. जगभरातील ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने देण्याची भारतीय शेतकऱ्यांची क्षमता प्रदर्शित करणे हा या ब्रँडचा उद्देश आहे. - पास्कल फोएहन, इन्नोटेराचे ग्रुप सीओओ आणि को-हेड प्लॅटफॉर्म