रत्नागिरी: भाऊबीजेसाठी येणाऱ्या तरुणाच्या कारला अपघात, कार जळून खाक; सुदैवाने चाैघे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:59 PM2022-10-26T12:59:06+5:302022-10-26T13:01:05+5:30
दुर्घटना घडली त्यावेळी त्यांची दाेन्ही मुले झाेपलेली हाेती. गाडीने पेट घेताच प्रसाद जाेशी यांनी तात्काळ गाडीबाहेर पडून पत्नी आणि मुलांना गाडीतून बाहेर काढले
दापोली : भाऊबीजेसाठी पुण्यातून दापोलीला येणाऱ्या भावाच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना साेमवारी मध्यरात्री माैजे दापाेली येथे घडली. या अपघातात वॅगनार कार जळून खाक झाली. सुदैवाने या अपघातात कारमधील चाैघे जण बचावले. मात्र, गाडीतील ८ ताेळे साेने व अन्य साहित्य जळून खाक झाले.
प्रसाद जाेशी (४०, रा. जालगाव, दापाेली) हे पत्नी विज्ञा (३६) आणि दाेन मुलांसह जालगाव येथे भाऊबीजेसाठी येत हाेते. पुण्यातून जालगावकडे येत असताना दापाेली - मंडणगड मार्गावरील माैजे दापाेलीदरम्यान त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. त्याचक्षणी शाॅर्टसर्किट हाेऊन गाडीने पेट घेतला. ही दुर्घटना घडली त्यावेळी त्यांची दाेन्ही मुले झाेपलेली हाेती. गाडीने पेट घेताच प्रसाद जाेशी यांनी तात्काळ गाडीबाहेर पडून पत्नी आणि मुलांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी गाडीतील सामान काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका अधिक उडाल्याने त्यांना सामानही काढता आले नाही.
रात्री उशिराने दापाेली नगर पंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, ताेपर्यंत गाडीसह गाडीतील सर्व सामान जळून खाक झाले. यामध्ये आई-वडिलांसाठी घेतलेले नवीन कपडे, फराळ जळून गेले. तर सामानात डब्यात ठेवलेले ८ ताेळे साेने आगीत वितळून गेले. या दुर्घटनेत प्रसाद जाेशी आणि त्यांची पत्नी यांना किरकाेळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.