रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा
By अरुण आडिवरेकर | Published: June 15, 2023 11:49 AM2023-06-15T11:49:18+5:302023-06-15T11:50:46+5:30
कॅश काऊंटरवरुन ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चोरले
रत्नागिरी : रत्नागिरीतील एका बँकेतील कॅशिअरने बँकेला दीड लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या कॅशियरने खऱ्या नोटांच्या बदली खेळण्यातल्या नोटा ठेवून बँकेची फसवणूक केल्याचे बँकेच्या अंतर्गत तपासणीत उघड झाले. या पकरणी कॅशिअरवर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय चंद्रकांत वेशविकर असे कॅशिअरचे नाव आहे. अक्षय वेशविकर हा डोंबिवली नागरी सहकारी बॅक लि. शाखा रत्नागिरी या बँकेत कॅशिअर होता. त्याने नोव्हेंबर २०२२ ते ६ जून २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याया मुदतीत हा प्रकार केला. कॅश काऊंटरवरुन ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटांचे चार बंडल तसेच १० बंडल असलेल्या स्ट्रॉंग रुममधील रिममध्ये असलेले एकूण १४ बंडल चोरले. त्याने एकूण १ लाख ६१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.
ही चोरी लपविण्यासाठी त्याने रुममध्ये ५०० रुपयांच्या ३२३ लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा ठेवून बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.