Ratnagiri- पावसाळ्यात रघुवीर घाट खुला ठेवण्याचे आव्हान, स्थानिकांच्या दळणवळणासह रोजगाराचाही प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:55 PM2023-04-01T12:55:30+5:302023-04-01T12:55:59+5:30

गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता

The challenge of keeping the Raghuveer Ghat open during the monsoons, the issue of employment along with local communication | Ratnagiri- पावसाळ्यात रघुवीर घाट खुला ठेवण्याचे आव्हान, स्थानिकांच्या दळणवळणासह रोजगाराचाही प्रश्न

Ratnagiri- पावसाळ्यात रघुवीर घाट खुला ठेवण्याचे आव्हान, स्थानिकांच्या दळणवळणासह रोजगाराचाही प्रश्न

googlenewsNext

हर्षल शिराेडकर

खेड : पावसाळा सुरू झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत खेड तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटकांना आकर्षित करतो. उंच उंच कडे, दाट धुके आणि थंडगार वातावरण अनुभवण्यासाठी जिल्ह्यासह पुणे, मुंबई आदी महानगरातील पर्यटकांची पावले आपोआप या घाटाकडे वळतात. मात्र, गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे आता यावर्षी हा घाट पर्यटकांसाठी खुला ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमाेर राहणार आहे.

पावसाळ्यात रघुवीर घाटात अनेक पर्यटक घाटाचे सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध हाेताे. घाटाची समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची आहे. खोपी, शिंदी,वळवण,बामणोली मार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग पर्यटन करताना विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, विविध प्रकारचे लहान-मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, वाऱ्याचा सळसळणारा आवाज कानात घुमतो. सारेच अद्भूत आणि विलोभनीय मनाला संजीवनी देणारे असल्याने पर्यटकांना ते आकर्षित करते.

घाट परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याने हा घाट रोजगार निर्मितीला चालना देणारा ठरत आहे. खेड ते रघुवीर घाट या मार्गावरील वेरळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, कुळवंडी, बिजघर, मिर्ले आदी ठिकाणी प्रेक्षकांना खुणावणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या घाटात पावसाळ्यात आढळणारे लाल खेकडे येथील विशेष आकर्षण आहेच, शिवाय धबधबे पर्यटकांसाठी मनमोहक ठरत आहेत. रघुवीर घाटात लहान-मोठे अनेक धबधबे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

मात्र, पावसाळ्यामध्ये अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस अडकून पडण्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येताे. त्याचा परिणाम येथील व्यवसायावर हाेत आहे. हा घाट पावसाळ्यात सुरू ठेवण्याचे आव्हान राहणार आहे.


पावसाळ्यात येथे पर्यटक येत असल्याने आम्हाला रोजगार उपलब्ध होतो. तर कांदाटी खोऱ्यातील लोकांचा जगाशी संपर्क राहतो. सध्याची घाटाची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने घाटाची दुरुस्ती तातडीने करून पावसाळ्यात पर्यटनासाठी घाट उपलब्ध करून द्यावा. - अनिल भोसले, हॉटेल व्यावसायिक, रघुवीर घाट.

Web Title: The challenge of keeping the Raghuveer Ghat open during the monsoons, the issue of employment along with local communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.