उड्डाणपूल कोसळणं ही दुर्दैवी घटना; त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई
By संदीप बांद्रे | Published: October 17, 2023 11:10 AM2023-10-17T11:10:16+5:302023-10-17T11:10:36+5:30
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून पहाटे घटनास्थळाची पाहणी
चिपळूण : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणं ही दुर्दैवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे फार महत्वाचे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गुप्ता, सिन्हा व मिश्रा या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल (सोमवारी) कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी आज पहाटे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत उपस्थित होते.
मंत्री चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना ही दुर्दैवी आहे. दोन किलोमीटरचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाची असणारी तिघा तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करुन, अहवाल देईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने वर असणारे गर्डल काढणे हे देखील महत्त्वाचे आहे.
केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही हा महामार्ग गतीने झाला पाहिजे, यासाठी बैठक घेऊन सूचना केली होती. त्याबाबतची बँकेबाबतची समस्याही मार्गी लावली होती. मुंबई-गोवा महामार्ग व्हायला हवा, ही प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? त्याबाबत शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.