स्वच्छतागृहे, शौचालयांच्या अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी केली विभागप्रमुखांची कानउघाडणी
By शोभना कांबळे | Published: August 24, 2023 04:48 PM2023-08-24T16:48:57+5:302023-08-24T16:49:23+5:30
जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्वच कार्यालय प्रमुखांना स्वच्छता ठेवण्याबाबत यापूर्वीही वारंवार सूचित केले आहे.
रत्नागिरी : सर्वच कार्यालय प्रमुखांनी कार्यालयात स्वच्छता, टापटीप ठेवावी. तहसीलदार कार्यालय इमारतीमधील शौचालय, स्वच्छतागृहांबाबत अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. त्याबाबत एजन्सी नेमून स्वच्छता कायम ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. त्याचबरोबर उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या शौचालयात सापडलेल्या देशी दारुच्या बाटल्यांबाबत वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीसंदर्भात तात्काळ लेखी खुलासा करावा, असे आदेश उपअधिक्षक भूमी अभिलेख यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्वच कार्यालय प्रमुखांना स्वच्छता ठेवण्याबाबत यापूर्वीही वारंवार सूचित केले आहे. याबाबत प्रसार माध्यमांमधून बातमी प्रसिध्द झाली होती. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी उपअधिक्षक भूमी अभिलेख यांना पत्र पाठवून कार्यालय प्रमुख म्हणून स्वच्छतेच्या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आपला खुलासा तात्काळ सादर करावा, असे आदेश दिले आहेत.
तहसीलदार कार्यालय इमारतीमधील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत पत्रकारांनी स्वच्छता करुन आंदोलन केले. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्वच विभागप्रमुखांची तातडीने बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी केली. कार्यालय हे देखील आपले घर आहे. घराप्रमाणेच कार्यालयेही स्वच्छ असावीत. आपल्या मजल्यावरील स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता ठेवणे हे देखील आपले कर्तव्य आहे. पत्रकारांनी येऊन त्याची स्वच्छता करणे ही बाब आपल्यासाठी अजिबात भूषणावह नाही, असे त्यांनी सुनावले.
सर्वच प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय प्रमुखांनी शौचालये, स्वच्छतागृहांमधील स्वच्छतेबाबत सजग असायला हवे. याबाबत तहसीलदारांनी तात्काळ एजन्सी नेमून ही स्वच्छता कायम ठेवावी. ज्या इमारतीमध्ये ज्या मजल्यावर शौचालये, स्वच्छतागृहे आहेत त्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखांनी घ्यावी. कामानिमित्त येणारे अभ्यागत, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी याची स्वच्छता सर्वात महत्वाची आहे. याबाबत अजिबात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.