परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला तडे, मातीचा भरावही खचतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:52 AM2023-07-04T11:52:01+5:302023-07-04T11:52:33+5:30
घाटातील प्रवास काहीसा धोकादायक बनला
चिपळूण : मुसळधार पावसात सोमवारी (३ जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. घाटात काँक्रीटीकरणाच्या खालील मातीचा भरावही खचत असल्याने महामार्गाला तडे गेले आहेत. परिणामी घाटातील प्रवास काहीसा धोकादायक बनला आहे. खचलेल्या रस्त्याचा वाहतुकीला कोणताही धोका नसून, पावसाळ्यानंतर खचलेल्या भागात नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग महाड विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
परशुराम घाट सुमारे ५.४० किलोमीटर लांबीचा आहे. घाटातील काँक्रीटीकरणाची एक मार्गिका पूर्णत्वाला गेली आहे. घाटातील लांबीपैकी १.२० किलोमीटर लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दऱ्या असल्याने डोंगर कटाईनंतर या भागात गेल्या आठवडाभरापासून दगड, माती अधूनमधून कोसळत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणीही केली होती. त्यातच सोमवारी घाटातील काँक्रीटीकरणाला तडे गेल्याचे समोर आले आहे. घाटात शंभर मीटरचे काँक्रीटीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला. आता याच मार्गावर काँक्रीटीकरणाला तडे गेले आहेत.
घाटात रस्त्याला तडे गेल्यानंतर पेढे सरपंच आरुषी शिंदे, उपसरपंच अष्टविनायक टेरवकर, ग्रामविकास अधिकारी नारायण कटरे, ग्रामस्थ बबन पडवेकर, बंटी शिंदे आदींनी या भागाची पाहणी केली. घाटात चौपदरीकरण करणाऱ्या कल्याण टोलवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या भागाची पाहणी केली. महामार्गाला तडे गेले तरी वाहतुकीला त्याचा धोका नाही. पावसाळ्यानंतर या भागात नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.