दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यातील पाले येथील 'त्या' मृताचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:45 PM2022-12-29T15:45:30+5:302022-12-29T15:45:55+5:30
कोरोना संशयित वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता
मंडणगड : तालुक्यातील पाले येथील ६५ वर्षे वयाच्या कोरोना संशयित वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. तो चौथ्या लाटेतील रुग्ण असण्याच्या शक्यतेने आरोग्य यंत्राणाही सतर्क झाली. मात्र, बुधवारी त्याचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.
पाले येथील संबंधित व्यक्तीला अनेक वर्षांपासून दम्याचा आजार होता. ते नियमित तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात येथे गेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. या रुग्णाची ॲन्टीजन चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता दापोली येथे हलविण्यात आले. तेथे या रुग्णाचे निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर पाले येथे अंतिम संस्कार करण्यात आले. कोरोना बाधितांवर करण्यात येणाऱ्या अंतिम संस्काराचे सर्व निकष पाळण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांची कोरोना तपासणीही आरोग्य विभागाने केली. दरम्यान, बुधवारी दुपारी मृत रुग्णाच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आरोग्य यंत्रणेला मिळाला असून, हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही काही प्रमाणात कमी झाला आहे.