देशातील पहिलं महिला कृषी महाविद्यालय कोकणात, 'या' शिक्षण संस्थेला झालं मंजूर
By मेहरून नाकाडे | Published: July 22, 2023 01:39 PM2023-07-22T13:39:15+5:302023-07-22T13:47:21+5:30
रत्नागिरी : कृषी शिक्षणाकडे मुलींचा वाढता कल लक्षात घेता, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे तर्फे चिपळूण ...
रत्नागिरी : कृषी शिक्षणाकडे मुलींचा वाढता कल लक्षात घेता, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे तर्फे चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेसाठी जिजामाता महिला कृषी महाविद्यालयासाठी मंजूर केले आहे. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय ठरले आहे.
कृषीभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेने देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा बहुमान मिळविला आहे. या संस्थेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम सुरू असून या संस्थेचा २५० एकर परिसर आहे. आंबा, काजू, नारळ, पोफळी, भात व इतर लागवड, गांडूळ खत प्रकल्प, पोल्ट्री, डेअरी प्रकल्प सुरू आहेत.
ही संस्था कृषी महाविद्यालयातून प्रॅक्टीकल पदवीधर तयार करण्याचे कार्य गेली २३ वर्षापासून करत आहे. कृषीभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे यांच्या कल्पनेतून हे महिला कृषी महाविद्यालय मंजूर झाले आहे. भारतातील एकूण शेती करणाऱ्यांपैकी ७० टक्के महिला शेती करतात. त्यामुळे भविष्यात कृषी शिक्षण घेतलेल्या महिला शेतीत उतरतील व आधुनिक शेती करतील, व उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास आहे.
जिजाामाता महिला कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या महिला कृषी महाविद्यालयाचा कोड नंबर ११३११ असा आहे. ज्या मुलींनी इतर कृषी महाविद्यालयांना प्राधान्यक्रम दिला असेल तर तो बदलून जिजामाता कृषी महाविद्यालयास प्राधान्यक्रम देवू शकतात. त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
या महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह, मेस, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, वर्गखोल्या, सुसज्ज ग्रंथालय, उच्चशिक्षित व तज्ञ प्राध्यापक वर्ग या बाबींचीही उपलब्धता करण्यात आली आहे. सर्व सोयींनीयुक्त असे हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय, असल्याचा विश्वास डाॅ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केला आहे. बारावी, सीईटी परीक्षेतील गुणांवर प्रवेश होणार असून चारवर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना बीएसएसी अॅग्री (ओनर्स) ही पदवी मिळणार आहे.