रत्नागिरीतील प्रसन्न कांबळी यांच्या शब्दकोड्याची इंडिया बुकात नोंद

By शोभना कांबळे | Published: June 24, 2024 02:23 PM2024-06-24T14:23:00+5:302024-06-24T14:24:50+5:30

६२ हजार ५०० चौकोनांचे जंबो शब्दकोडे करण्याचा आगळा विक्रम

The Crossword of Prasanna Kambli of Ratnagiri is recorded in the India Book | रत्नागिरीतील प्रसन्न कांबळी यांच्या शब्दकोड्याची इंडिया बुकात नोंद

रत्नागिरीतील प्रसन्न कांबळी यांच्या शब्दकोड्याची इंडिया बुकात नोंद

रत्नागिरी : येथील शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी २५० × २५० म्हणजे तब्बल ६२५०० चौकोनांचे कोडे पूर्ण केले असून या कोड्याची दखल इंडिया बुकने घेतली आहे. आता ५०१ × ५०१ चा रेकाॅर्ड मोडून गिनीच वर्ल्ड बुकात नाव नोंदविण्याचा जागतिक विक्रम आपण नक्की करणार, असा आत्मविश्वास येथील शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

शहरातील हॉटेल आरती डायनिंग येथे सोमवारी त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली. श्री. कांबळी गेली तीस वर्षे शब्दकोडी तयार करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी सर्व दैनिके आणि साप्ताहिकांमधून त्यांची शब्दकोडी प्रकाशित झाली आहेत. विशिष्ट विषयावर कोडे, पाच मिनिटांत कोडे, एकाला एक जोडून महाशब्दकोडे होईल, अशी अनेक कोडी त्यांनी रचली आहेत. एकूण दहा हजार शब्दकोडी पूर्ण झाली आहेत. 

त्यांनी २५० × २५० म्हणजे तब्बल ६२,५०० चौकोनांचे कोडे पूर्ण केले असून या कोड्याची दखल इंडिया बुकने घेतली आहे. या कोड्यामध्ये १३८८६ आडवे शब्द आणि १३८४५ उभे शब्द आहेत. हे शब्दकोडे बनवायला त्यांना सुमारे चार वर्षे लागली. काही वेळा व्यत्यय आल्यामुळे हे विहीत मुदतीत पूर्ण झाले नाही. परंतु कांबळी यांची कोडी दोन वेळा इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहेत,तर लिम्का बुकमध्ये एकदा असा तीन वेळा राष्ट्रीय विक्रम केला आहे. आता एशिया बुकसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत.

कांबळी यांनी सन १९९५ पासून मराठी शब्दकोडी करून वृत्तपत्रांत देण्यास सुरूवात केली. कांबळी हे मुळचे वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावचे. दापोली तालुक्यातील केळशी येथे त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्र कृषी उद्योग मर्यादित या शासनाच्या अंगीकृत उद्योगातून ते वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. शब्दकोडी तयार करणे, उकडीचे मोदक बनविणे, रांगोळी काढणे आणि मोफत विवाह मेळावे यामुळे ते लोकप्रिय आहेत.

उकडीचे मोदक करण्यात तरबेज असलेले कांबळी यांनी श्री गणेशाचे बेचाळीस लाख जप केले आहेत. सव्वीस वर्षांची अविरत तपस्या, हे माझ्या यशाचे गमक आहे, असे म्हणून 'चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्रीगणेश, श्रीदेव वेतोबा, कुलस्वामिनी म्हाळसाई माता, दिवंगत आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि पत्नी मयुरी यांच्या सहकार्याने हे यश खेचून आणल्याचे त्यांनी सांगितले. या शब्दकोड्यासाठी वैभव भाटकर (ठाणे), मुलगा ओंकार, मुलगी सुरभि, मकरंद पटवर्धन, मृणाल पटवर्धन यांचे सहकार्य लाभले व प्रसन्न आंबुलकर, शेखर भुते यांनी प्रोत्साहन दिल्याचे प्रसन्न कांबळी यांनी सांगितले.

Web Title: The Crossword of Prasanna Kambli of Ratnagiri is recorded in the India Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.