चिपळूणच्या रानभाज्या महोत्सवाकडे अनेकांची पाठ; अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच खरेदी केल्या भाज्या
By संदीप बांद्रे | Published: August 11, 2023 07:07 PM2023-08-11T19:07:03+5:302023-08-11T19:09:19+5:30
तालुक्यातून अवघे सहाच महिला बचत गटाचे स्टॉल
चिपळूण : रानभाज्यांविषयीची जनजागृती व त्याची खरेदी, विक्री व्हावी, यादृष्टीने कृषी विभागाने शुक्रवारी (११ ऑगस्ट) रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे तालुकास्तरीय या महोत्सवात शेतकऱ्यांची उपस्थिती न लाभल्याने अखेर हा महोत्सव शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच अनुभवला. इतकेच नव्हे त्यांनीच सर्वाधिक भाज्या खरेदी केल्या. यातूनच रानभाज्या महोत्सव कर्मचाऱ्यांसाठी भरवण्यात आला होता की काय, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.
बहुगूणी असणाऱ्या रानभाज्या केवळ पावसातच मिळत असल्याने त्यांचा स्वाद घेण्यासाठी नागरिक आवर्जून वाट पाहत असतात. याशिवाय आजच्या दैनंदिन जीवनातील भाज्या महाग झाल्याने त्याला पर्याय म्हणून रानभाज्या ठरत आहेत. रानभाज्याविषयी नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती व्हावे त्याचे महत्त्व कळावे, याशिवाय या भाज्याची महोत्सवाद्वारे खरेदी विक्री व्हावी, यातूनच शेतकऱ्यांसह महिला बचत गटांची आर्थिक उलाढाल व्हावी यासाठी दरवर्षापमाणे यंदाही तालुका कृषी विभागातर्फे पंचायत समितीच्या सभागृहात रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता.
तालुकास्तरीय असणाऱ्या महोत्सवात कृषीने गाजावाजा न केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, तर इतर नागरिकही उपस्थित नव्हते. शिवाय शंभरहुन अधिक तालुक्यात बचत गट असताना रानभाज्या विक्रीसाठी तालुक्यातून अवघे सहाच महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले होते. मात्र, गर्दी न झाल्याने रानभाज्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न काहीसा बारगळला.
विशेष म्हणजेच पंचायत समितीच्या सभागृहात रानभाज्याचा महोत्सव आयोजित करण्यात आल्याने पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची महोत्सव बघण्यासाठी, तर रानभाज्या खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. यातूनच हा रानभाज्या महोत्सव शेतकरी, बचत गट, नागरिक यांच्यासाठी न भरवता तो कर्मचाऱ्यांसाठी भरवण्यात आला, की काय अशी चर्चा सुरू हाेती. बहुगूणी असलेल्या रान भाज्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी शासकीय कार्यालयापेक्षा एखाद्या महाविद्यालयात किंवा विभागवार घेणे अपेक्षित होते, असेही काहींचे म्हणणे आहे.