Ratnagiri: विहिरीच्या तळाशी सापडलेल्या लाकडाचे कुतूहल, ब्रिटिशकालीन राजापूरच्या इतिहास उलगडण्यास मदत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 12:52 PM2024-01-02T12:52:51+5:302024-01-02T12:53:17+5:30
- विनोद पवार राजापूर : राजापूर म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला एक सुंदर तालुका. या तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदी काठावरील ...
- विनोद पवार
राजापूर : राजापूर म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला एक सुंदर तालुका. या तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदी काठावरील कुंभार मळ्यामध्ये एका शेतातील विहिरीत गाळ उपशाचे काम सुरू हाेते. हे काम सुरू असतानाच विहिरीच्या तळाशी सुमारे पंधरा-वीस फूट अंतरावर गाळामध्ये रुतलेले ३६ इंची गोलाईचे सुके लाकूड आढळले. प्रथमदर्शनी हे लाकूड या ठिकाणी नेमके कसे आणि कुठून आले, याचे कुतूहल आहे. त्याबाबत विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. पूर्वीच्या काळी बोटी, होड्या बनविण्यासाठी भेंडीच्या झाडाच्या लाकडांचा उपयोग केला जात हाेता. त्या काळामध्ये होडी वा बोट तयार करण्यासाठी आणलेल्या भेंडीच्या झाडाच्या लाकडाच्या ओंडक्यांपैकी हा ओंडका असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अर्जुना नदीच्या काठावरील कुंभार मळ्यामध्ये रानडे कुटुंबीयांची अनेक वर्षांपूर्वीची विहीर आहे. या विहिरीतील गाळ उपसा करण्याचे गेल्या चौदा दिवसांपासून काम सुरू आहे. हा गाळ उपसा करताना सुमारे पंधरा-वीस फूट अंतरावर सुरुवातीला लागलेल्या काळ्या मातीच्या थराखाली टणक असलेले सुके लाकूड आढळले. मातीच्या थराखाली अचानक मोठ्या जाडीचे आणि सुमारे २० फूट लांबीचे लाकूड आढळल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही माहिती पसरताच अनेकांची पावले लाकडाचा ओंडका पाहण्यासाठी विहिरीकडे वळली.
पूर्वीच्या काळी बोट, होड्या वा जहाज बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेंडीची मोठ्या प्रमाणात झाडे पूर्वीच्या गाडीतळ भागामध्ये असल्याची माहिती काही ज्येष्ठ ग्रामस्थांकडून दिली जात आहे. त्यामुळे रानडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये सापडलेले लाकूड भेंडीच्या झाडाचे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी काहींकडून विहिरीमध्ये सापलेल्या लाकडाचा टणकपणा, रंग आणि टिकण्याची क्षमता पाहता, ते सिसम झाडाचे लाकूड असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ब्रिटिश काळामध्ये राजापूर बंदरामध्ये मोठमोठी गलबते-जहाजे येत होती. काळानुरूप नदीपात्राचा भाग गाळाने भरला आहे. त्यामुळे त्या काळामध्ये नदीपात्राची खोली नेमकी खोली किती होती, याचा अंदाज येत नाही. मात्र, विहिरीमध्ये सापडलेला ओंडका ब्रिटिश काळामध्ये नदीपात्राची नेमकी खोली किती होती, यावर प्रकाशझोत पडण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्याचवेळी ब्रिटिशकालीन राजापूरच्या इतिहासाची पानेही उलगडण्यास मदत होणार आहे.
कुंभार मळा परिसरामध्ये विविध शेतकऱ्यांच्या आठ-नऊ विहिरी आहेत. तर लगतच्या पाटील मळ्यामध्येही एक विहीर आहे. रानडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये जितक्या अंतरावर काळ्या मातीचा थर लागला, तेवढ्या अंतरावर अन्य विहिरींमध्ये काळ्या मातीचा थर यापूर्वी लागलेला नसल्याची माहिती राजू रानडे यांनी दिली.
रानडे यांच्या विहिरीमध्ये ज्या अंतरावर काळ्या मातीचा थर लागला, त्या अंतरावर अन्य विहिरींमध्ये नदीपात्राच्या तळाशी लागणारा रेवट्यासारखा भाग यापूर्वी आढळल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भूगोल अभ्यासक प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विहिरीमध्ये सापडलेले लाकूड आणि मातीचे नमुने आनंद मराठे यांनी योग्य पद्धतीने संकलित केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याच्यावर होणाऱ्या संशोधनातून हे झाड नेमके कशाचे आहे, नदीपात्राची खोली ब्रिटिश काळामध्ये नेमकी किती होती, यावर प्रकाशझोत पडण्यास उपयुक्त ठरणार आहे. -धनंजय मराठे, इतिहास अभ्यासक