Ratnagiri: सवतसडा धबधब्यात सापडलेला 'तो' मृतदेह परशुराम गावातील महिलेचा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:14 PM2023-12-06T12:14:57+5:302023-12-06T12:15:13+5:30
आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह चैतन्या चंद्रकांत मेटकर (३४) या महिलेचा आहे. धबधब्यात पाणी नसताना आणि मृतदेह ज्या परिस्थितीत आढळला ते पाहता ही आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
परशुराम घाटाजवळ असलेल्या सवतसडा धबधबा या ठिकाणी असलेल्या दगडाच्या रांजणात खडकात अडकेलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह सापडला. सुरुवातीला या महिलेचे नाव कळत नसल्याने हा मृतदेह कोणाचा? ही महिला कोण? हा सगळा प्रकार काय आहे? याबाबत तपास सुरू हाेता.
चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या मृतदेहाचे नाव आणि अन्य प्राथमिक माहिती मिळवली आहे. ही महिला नातेवाइकाकडे जाते, असे सांगून घरातून निघाल्याची चर्चा सुरू हाेती. सोमवारी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी नोंद करून तपासाला सुरुवात केली.
ही महिला परशुराम येथील पायरवाडीत राहणारी आहे. या महिलेचा पती मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार आहे. या महिलेला एक लहान मुलगा असून ती गावी आपले सासरे, दीर, जाऊ आणि दिराची दोन मुले यांच्या साेबत राहत होती. ही महिला घरातून निघून गेल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली होती का? ही महिला त्या ठिकाणी नेमकी कोणत्या कारणासाठी गेली? किंवा तिने स्वतःहून काही जिवाचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न केला का, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.