रत्नागिरीत रमजान ईदचा उत्साह, मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा
By मेहरून नाकाडे | Published: April 11, 2024 06:26 PM2024-04-11T18:26:47+5:302024-04-11T18:28:39+5:30
रत्नागिरी : मुस्लिम बांधवांचा ‘ईद ऊल फित्र’ अर्थात रमजान ईद गुरूवारी (११ एप्रिल) जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ईदमुळे ...
रत्नागिरी : मुस्लिम बांधवांचा ‘ईद ऊल फित्र’ अर्थात रमजान ईद गुरूवारी (११ एप्रिल) जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ईदमुळे मुस्लिम मोहल्ल्यात बुधवारपासूनच लगबग सुरू होती. फजर नमाजनंतर ‘ईद ऊल फित्र’ चा विशेष नमाज अदा करण्यात आला. नमाज अदा करण्यात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू बांधवांनाही ईदचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष, सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.
आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी ‘ईद ऊल फित्र’ या सणाची ओळख आहे. पवित्र रमजान महिन्यातील रोजे पूर्ण झाल्यानंतर चंद्रदर्शनानंतर ईद साजरी केली जाते. आखाती देशात एक दिवस आधी ईद साजरी करण्यात आली. त्यामुळे जिल्हाभरातील मुस्लिम धर्मियांनी ईद गुरूवारी साजरी केली. ईदच्या दिवशी पहाटे (फजर) नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये जाऊन एकत्रितपणे अदा केला. त्यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत ‘ईद ऊल फित्र’ चा नमाज अदा करण्यात आला.
ईदच्या नमाज नंतर आसपास, शेजारी, मित्र परिवार, नातेवाइकांमध्ये शीरखुर्मा, मिठाई, सुकामेव्याची देवाणघेवाण सुरू होती. मिठाई बरोबर शुभेच्छा ही देण्यात येत होत्या. ईद निमित्ताने शांतता, सुव्यवस्था राखताना पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनीही शहरी तसेच ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.