कोकणातील पहिली ‘मराठा-कुणबी’ नोंद दापोलीत, जातीच्या नोंदीची शोधमोहीम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:12 PM2023-11-06T13:12:16+5:302023-11-06T14:20:45+5:30

शिवाजी गोरे दापाेली : शासनाच्या आदेशानुसार राज्यात ‘कुणबी-मराठा’ जातीच्या नाेंदीची शाेध माेहीम सुरू आहे. दापाेली तालुक्यात ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख ...

The first Maratha Kunbi record in Konkan is found in Dapoli | कोकणातील पहिली ‘मराठा-कुणबी’ नोंद दापोलीत, जातीच्या नोंदीची शोधमोहीम सुरु

कोकणातील पहिली ‘मराठा-कुणबी’ नोंद दापोलीत, जातीच्या नोंदीची शोधमोहीम सुरु

शिवाजी गोरे

दापाेली : शासनाच्या आदेशानुसार राज्यात ‘कुणबी-मराठा’ जातीच्या नाेंदीची शाेध माेहीम सुरू आहे. दापाेली तालुक्यात ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख असलेल्या दाेन नाेंदी सापडल्या असून, काेकणातील या पहिल्याच नाेंदी असल्याचे सांगण्यात येत आहे. दापाेलीतील कांगवाई व पाेफळवणे गावातील ग्रामस्थांच्या मृत्यूबाबत केलेल्या या नाेंदीमध्ये ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख सापडला आहे.

मराठा समाजाला ‘कुणबी-मराठा’ असे जात प्रमाणपत्र देऊन त्यांना तसे आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनाेज जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी बेमुदत उपाेषणाचा मार्गही अवलंबला हाेता. त्यानंतर शासन दप्तरी असणाऱ्या नाेंदी तपासून ‘कुणबी-मराठा’ नाेंदीचा शाेध घेण्यात येत आहे. त्यासाठी शासन दप्तरी असणाऱ्या जन्म-मृत्यूच्या नाेंदी तपासण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी नाेंदी तपासण्याच्या कामात व्यस्त आहेत.

काेकणात माेठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. मात्र, हा समाज ‘कुणबी-मराठा’ नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मराठा समाजाने ‘कुणबी-मराठा’ असे प्रमाणपत्र घेण्यास विराेधही दर्शविला आहे. मात्र, दापाेली तालुक्यात ‘मराठा-कुणबी‘ अशी नाेंद असलेले पुरावेच सापडले आहेत.

दापाेलीतील तहसील कार्यालयात अस्तित्वात असलेल्या महसुली दप्तरी ‘मराठा-कुणबी’ अशा नाेंदी आढळल्या आहेत. तालुक्यातील कांगवाई गावातील गंगाराम सखाराम घाग यांच्या मृत्यूची नाेंद १२ डिसेंबर १९६५ राेजी करण्यात आली असून, त्यातही ‘मराठा - कुणबी’ असा उल्लेखआहे. तसेच पाेफळवणे गावातील दाैलत धाेंडू माेरे यांच्या मृत्यूबाबत २४ डिसेंबर १९६७ राेजी नाेंद करण्यात आली आहे. त्यांच्या नावासमाेर ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या दाेन्ही नाेंदी काेकणात आढळलेल्या पहिल्याच नाेंदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

वारसदारांच्या संपर्कात

‘मराठा-कुणबी’ नोंदी आढळलेल्या दौलत माेरे आणि गंगाराम घाग यांच्या वारसदारांशी महसूल विभाग संपर्क साधत आहे. त्यांचे वारसदार मुंबईत राहत असून, त्यांना दापोलीत बोलावण्यात येणार आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या जात प्रमाणपत्रांवर कोणत्या नोंदी आहेत, याची माहिती महसूल विभाग घेणार आहे.


दापोली तालुक्यातील दोन गावांत ‘मराठा-कुणबी’ अशी नोंद सापडली आहे. या नाेंदी १९६५ आणि १९६७ सालातील असून, याबाबत समिती पुढे माहिती ठेवून पुढील निर्णय घेतला जाईल. - अर्चना बोंबे-घोलप, तहसीलदार, दापोली.

Web Title: The first Maratha Kunbi record in Konkan is found in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.