कोकणातील कासवांचे पहिले रहस्य उलगडले, ट्रान्समीटर लावलेल्या सावनीने दुसऱ्यांदा घातली अंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 07:16 PM2022-02-26T19:16:46+5:302022-02-26T19:17:08+5:30

अरबी समुद्रातील या कासवांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय मँग्रोव्ह फाउंडेशनने घेतला होता

The first secret of the Konkan turtles was revealed, The second time the eggs were laid by the transmitter | कोकणातील कासवांचे पहिले रहस्य उलगडले, ट्रान्समीटर लावलेल्या सावनीने दुसऱ्यांदा घातली अंडी

कोकणातील कासवांचे पहिले रहस्य उलगडले, ट्रान्समीटर लावलेल्या सावनीने दुसऱ्यांदा घातली अंडी

Next

मंडणगड : गेल्या महिन्यात वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थांतर्गत (डब्लूआयआय) आंजर्ले किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेल्या सावनी नामक मादी कासवाने पुन्हा एकदा अंडी दिली आहेत. शुक्रवार, दि. २५ रोजी पहाटे केळशीच्या किनाऱ्यावर सावनी अंडी घालताना आढळली. भारताच्या किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा वीण करत असल्याचा हा पहिलाचा पुरावा आहे.

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील या कासवांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय मँग्रोव्ह फाउंडेशनने घेतला होता. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वेळास, आंजर्ले आणि गुहागर किनाऱ्यावर मिळून एकूण पाच मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून या माद्यांच्या समुद्रातील हालचालींवर डब्लूआयआय आणि मँग्रोव्ह फाउंडेशनमधील संशोधक लक्ष ठेवून होते. अशातच शुक्रवारी पहाटे सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेली एक मादी केळशीच्या किनाऱ्यावर अंडी घालताना कासवमित्र राकेश धोपावकर आणि लहू धोपावकर यांना आढळून आली. त्यांनी लागलीच यासंबंधीची माहिती मँग्रोव्ह फाउंडेशनला दिली.

२५ जानेवारी रोजी आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर एका मादी कासवाने ८७ अंडी घातली होती. तिला सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून तिचे नामकरण सावनी असे करण्यात आले. गेले महिनाभर समुद्रात वावर केल्यानंतर तिने २५ फेब्रुवारी रोजी केळशी येथे पहाटे चार वाजता ७६ अंडी घातली आहेत. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या विणीच्या हंगामात एकाहून अधिक वेळा अंडी घालण्यासाठी येतात, हे त्यामुळे पुराव्यानिशी समजले आहे.

सावनीला टॅग करणारे डब्लूआयआयचे संशोधक डाॅ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या महिन्याभरात सावनीचा वावर किनारपट्टीपासून १० किमी अंतरादरम्यान होता. ती सावित्री नदीच्या मुखाशी गेली होती. त्यानंतर ती वेळास ते आंजर्ले दरम्यानच्या सागरी परिक्षेत्राच वावरत होती. सरतेशेवटी तिने शुक्रवारी केळशीच्या किनाऱ्यावर अंडी घातली.

Web Title: The first secret of the Konkan turtles was revealed, The second time the eggs were laid by the transmitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.