राज्यात यंदा चांगला पाऊस, अवकाळीचीही उशिरापर्यंत हजेरी; तरीही लांजा तालुक्यात धावला पहिला पाण्याचा टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 13:38 IST2022-01-20T13:37:45+5:302022-01-20T13:38:10+5:30
लांजा तालुक्यातील कोचरी गावातील भोजवाडी येथे भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

राज्यात यंदा चांगला पाऊस, अवकाळीचीही उशिरापर्यंत हजेरी; तरीही लांजा तालुक्यात धावला पहिला पाण्याचा टँकर
रत्नागिरी : जिल्ह्यात उशिरापर्यंत पाऊस पडूनही पाण्याची पातळी खोलवर गेल्याने लांजा तालुक्यातील कोचरी भाेजवाडी येथे भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे धनगर वस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते.
लांजा तालुक्यातील कोचरी गावातील भोजवाडी येथे भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. भोजवाडीमध्ये सुमारे १५० लोकवस्ती आहे. येथे असलेल्या विहिरी अचानक आटल्याने लोकांचा गळाही सुकला आहे. दरवर्षी जिल्ह्यात उशिराने पाणीटंचाई सुरू होते. मात्र, यंदा जानेवारीच्या पंधरवड्यातच पाणीटंचाई भेडसावू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मार्चपूर्वीच पाणीटंचाई सुरू झाल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्याकडे विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे येथे प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.