दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नाैका हाेणार लाटांवर स्वार, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:18 PM2022-08-01T16:18:18+5:302022-08-01T16:40:38+5:30
मासेमारी हंगाम सुरू हाेत असला तरी अनेक नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत.
रत्नागिरी : शासनाच्या बंदी आदेशानंतर गेले दोन महिने किनाऱ्यावर नांगरलेल्या मासेमारी नौका १ ऑगस्टपासून समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत. जिल्ह्यातील २,५६२ नौकांना मासेमारीसाठी मत्स्य खात्याकडून परवाने देण्यात आले असून, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज झाले आहेत.
जून आणि जुलै हे महिने माशांच्या प्रजननाचा आणि अंडी देण्याचा काळ असतो. या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते १ ऑगस्ट या दरम्यान खोलसमुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. मासेमारी बंदीच्या काळात नौकांच्या इंजिनाची देखभाल-दुरुस्ती व डागडुजी, नौकांची रंगरंगोटी करण्यात येते तसेच याच काळात जाळ्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्यांची खरेदी मच्छिमारांकडून करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा, राजीवडा, साखरतर, काळबादेवी, वरवडे, जयगड, राजापूर तालुक्यातील साखरीनाटे, जैतापूर, आंबोळगड, दापोलीतील हर्णै, दाभोळ, गुहागरमधील वेलदूर, पाजपंढरी, पडवे, मंडणगडातील बाणकोट आदी भागात मासेमारी केली जाते. या भागातील मच्छिमार आता मासेमारीसाठी सज्ज झाले आहेत. मासेमारी हंगाम सुरू हाेत असला तरी अनेक नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत. मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच नौकांमध्ये डिझेल आणि बर्फाचा साठा करण्यात आला आहे. सध्या वातावरणही मासेमारीसाठी अनुकुल असल्याने नांगरून ठेवलेल्या नाैका आता समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
गतवर्षी वादळांचा फटका
मागील मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला चक्रीवादळाने खोल समुद्रातील मासेमारीला ‘ब्रेक’ लागला होता. खवळलेल्या समुद्रामुळे १५ ऑगस्टनंतरच मासेमारीला सुरुवात झाली होती. गतवर्षी वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदाच्या हंगामात मासेमारीसाठी चांगले वातावरण असल्याचे दिसत आहे.
पर्ससीननेट मासेमारी बंदच
शासनाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून ट्रॉलिंग मासेमारी, गिलनेट आदी नौकांच्या मासेमारीला सुरू हाेणार आहे. मात्र, पर्ससीननेट मासेमारीवर बंदीच राहणार आहे. पर्ससीननेट मासेमारी एक महिना उशिराने म्हणजेच १ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहे. ही मासेमारी ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या नौकांना अवघे चार महिने मासेमारी करता येणार आहे. मात्र, इतर मासेमारी नौकांप्रमाणेच ३१ मेपर्यंत मासेमारी करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पर्ससीननेट मच्छिमारांनी केली आहे.