रत्नागिरीत ३६ तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले
By अरुण आडिवरेकर | Published: July 28, 2023 02:09 PM2023-07-28T14:09:30+5:302023-07-28T14:09:46+5:30
रत्नागिरी : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी, सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी ) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. ...
रत्नागिरी : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी, सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र, आज शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्याने पहाटे ६ वाजता बाजारपेठेतील पूर्ण पाणी ओसरले आहे.
चांदेराई बाजारपेठेतील लहान मोठी १०० पेक्षा अधिक दुकाने बाधित झाली तर चांदेराईमध्ये ५ ते ६ घरे तर हरचेरीमध्ये अनेक घरे या पुरात बाधित झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल साचलाय तर चांदेराई पुलावर कठडा २ वर्षांपूर्वी दुरुस्त केलेला तुटला आहे. चिंद्रावली रस्ता खचला तर रत्नागिरी देवधे महामार्ग चांदेराई मलुष्ट्येवाडी येथे नदीपात्र वळण दुरुस्ती व गॅबीयन वॉलचे काम निविदा होऊनही पावसाळ्यापूर्वी न केल्याने नदीकिनाऱ्यावरची दरड अजून कोसळली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जीवितहानी होण्याची भीती वाढली आहे.
या वर्षी नदीपात्रातील गाळ बाहेर न काढल्याने तो गाळ परत नदीपात्रात गेला. चांदेराई पुलाच्या वरच्या बाजूला किमान २ किमी व खालच्या बाजूला १ किमी गाळ उपसा करून तो गाळ नदी पात्रातून बाहेर काढल्यास तसेच हरचेरी कसबा या ठिकाणचा २ किमीमधील गाळ काढल्यास चांदेराई व हरचेरीवासीयांचा प्रती वर्षाचा पुराचा त्रास कमी होईल व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांचे होणारे नुकसान टळेल, असे मत चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी मांडले.