आंबाघाटातील गाय मुखातील 'तो' पाण्याचा प्रवाह बंद, अनेकांची भागवीत होता तहान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:02 PM2023-10-20T12:02:51+5:302023-10-20T12:03:06+5:30
साखरपा : रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात रोज शेकडो वाहनधारकांची व येणाऱ्या पर्यटकांची तहान भागविणाऱ्या गायमुखातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह ...
साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात रोज शेकडो वाहनधारकांची व येणाऱ्या पर्यटकांची तहान भागविणाऱ्या गायमुखातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अचानक बंद झाला. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या ठिकाणी नियमित वाहणारा पाण्याचा झरा आता बंद झाला आहे.
आंबाघाटातील एका वळणावर श्रीगणेशाचे छाेटे मंदिर हाेते. याच ठिकाणी गायमुखातून बारमाही पाण्याचा झरा वाहत हाेता. या मार्गावरून जाणारे पर्यटक, प्रवासी या ठिकाणी थांबून गणेशाचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघत हाेते. या ठिकाणी असणारा पाण्याचा झरा अनेकांची तहान भागवीत हाेता.
आंबाघाटातील गायमुखाशेजारी असलेल्या डोंगरातील मोठा दगड २४ जून २०२३ राेजी गायमुख व तेथे असलेल्या गणेश मंदिरावर कोसळला. या दुर्घटनेत मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतरही गायमुखातील पाण्याचा प्रवाह सुरूच होता. मात्र, काही दिवसांपासून पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. कोसळलेला दगडीचा भराव व पालापाचोळा साफ केला तर हे पाणी पुन्हा वाहू शकेल, असा काहींचा दावा आहे. त्यानुसार प्रयत्न करावेत, अशी मागणीही हाेत आहे.