विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, अस्तित्वाचा प्रश्न गंभीर; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 05:54 PM2022-08-17T17:54:56+5:302022-08-17T17:55:40+5:30
दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरुजाजवळील तटबंदी ढासळलेली होती
देवगड : विजयदुर्ग किल्ल्याच्या दर्या बुद्राखालील बाजूची तटबंदी लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र, याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या किल्ल्याच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज आहे. या दर्या बुरुजाच्या खालील तटबंदी १४ ऑगस्ट रोजी समुद्राच्या महाकाय लाटांमुळे ढासळली आहे. तटबंदीचा काहीसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
विजयुदुर्ग किल्ला हा ऐतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरुजाजवळील तटबंदी ढासळलेली होती. यावेळी अनेक राजकीय लोकांनी व लोकप्रतिनिधींची पाहणी करून किल्ल्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र या किल्ल्याची पाहणी करायला आलेल्या लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी कोणताही आवाज उठविला नसल्याने अखेर त्यांचे पाहणी दौरे हे पर्यटनात्मक दौरेच असल्याचे बोलले जात आहे.
संभाजीराजेंनी वारंवार आवाज उठविला
विजयदुर्ग किल्ल्याची दोन वर्षांपूर्वी तटबंदी ढासळली होती. त्यावेळी माजी खासदार संभाजीराजे यांनीही प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती. त्यांनीदेखील शासनदरबारी किल्ल्याची डागडुजी होण्यासाठी आवाज उठविला होता. मात्र, या किल्ल्याच्या डागडुजीसाठी कोणतीही उपाययोजना शासन स्तरावरून झाली नसल्यामुळे मंगळवारी किल्ल्याची समुद्राच्या भागाकडील समुद्राच्या लाटांमुळे तटबंदी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.