रत्नागिरीतील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 11:56 AM2022-11-22T11:56:12+5:302022-11-22T11:57:04+5:30
एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ०.५३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वक्र दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे वाहून गेले आहे.
खेड : तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे धरणातीलपाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही स्वरूपात व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे अज्ञाताला सहज हे कृत्य करणे शक्य झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या धरणाचे दरवाजे उघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते आणि अज्ञाताने धरणाचे दरवाजे अर्धवट उघडले होते. सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी कुणाल ढेरे यांनी दिली आहे.
तळवट धरणाच्या बांधकामाची सुरुवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. धरणाची २०१० मध्ये घळभरणी झाल्यानंतर त्यामध्ये आता ४.५४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होतो. एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ०.५३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वक्र दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे वाहून गेले आहे.
या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून, लवकरच धरणाचे दरवाजे बंद केले जातील, असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे; मात्र धरणासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने धरणाची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस या धरणाच्या काही सामानाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती.