चिपळुणातील उड्डाणपुलाचा गर्डर खचला; चौपदरीकरणांतर्गत काम सुरू असतानाच घडली घटना

By संदीप बांद्रे | Published: October 16, 2023 10:35 AM2023-10-16T10:35:43+5:302023-10-16T10:35:43+5:30

राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा हबकली

The girder of the flyover in Chiplun collapsed | चिपळुणातील उड्डाणपुलाचा गर्डर खचला; चौपदरीकरणांतर्गत काम सुरू असतानाच घडली घटना

चिपळुणातील उड्डाणपुलाचा गर्डर खचला; चौपदरीकरणांतर्गत काम सुरू असतानाच घडली घटना

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला आता कुठे वेग येत होता. अशातच सोमवारी सकाळी ८.३० वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर तुटले. यावेळी जोरदार आवाज झाला. त्यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिक भयभीत झाले. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा देखील हबकून गेली आहे.

पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणातील किमान एकेरी वाहतूक सुरु करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले. मात्र या कामी तितकेसे यश आले नाही. अजूनही एकेरी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. परंतु गेल्या महिनाभरात चिपळूण हद्दीत कामाचा वेग वाढला होता. विशेषतः शहरातील बहाद्दूरशेख नाक्यातील उड्डाण पुलाच्या कामाला चांगली गती मिळाली होती.

सुरुवातीला शहरातून जाणारा १.८५ किलोमीटर अंतराचा हा उड्डाण पूल उभारताना अनेक अडचणींना सामना करावा लागला. या पुलांतर्गत एकूण ४६ पिलर उभारल्यानंतर तात्काळ गर्डर चढविण्याचे काम सुरू केले आहे. वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेख नाका दरम्यानचे गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर नुकतेच अतिशय मुख्य नाक्यातील अवघड टप्प्यात काम सुरु केले होते.

उड्डाण पुलाचे काम वाशिष्ठी पुलाच्या बाजूने सुरु केले आहे. एकूण ४६ पिलर असताना त्यातील सहाव्या पिलर पर्यंतचे पूर्ण होत आले आहे. अशातच सोमवारी सकाळी पाचव्या पिलरच्या ठिकाणी असलेले गर्डर खचले. त्यामुळे परिसरात जोरदार आवाजही झाला. यावेळी काही नागरिकांची पळापळ झाली. पुलालगत असलेल्या इमारतीतील व्यापारी व रहिवाशांचीही धावाधाव झाली. या पुलाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनीही तेथुन पळ काढला. तूर्तास या पुलाचे काम थांबविण्यात आले आहे.  

Web Title: The girder of the flyover in Chiplun collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.