नरेंद्राचार्य महाराजांच्या कार्यात सरकारही सहभागी होईल - उपमुख्यमंत्री फडणवीस
By मनोज मुळ्ये | Published: October 21, 2023 06:52 PM2023-10-21T18:52:01+5:302023-10-21T18:53:37+5:30
जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे फडणवीस यांनी कौतुक केले
नाणीज : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याचा व अनेक उपक्रमांचा फायदा सरकारलाही होतो आहे. त्यांचे समाजोपयोगी कार्य मोठे आहे. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात सहभागी होण्याचा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
नाणीज येथील सुंदरगडावर शनिवारी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. याचवेळी त्यांच्या हस्ते महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी उपयुक्त असलेल्या आणखी दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. आता संस्थानकडे या सेवेत एकूण ५२ रुग्णवाहिका कार्यरत झाल्या आहेत.
जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे फडणवीस यांनी कौतुक केले. आपण जगायचे व दुसऱ्यालाही जगवायचे ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांची विचारधारा आहे. ते महाराष्ट्रातील धर्मांतराचे षडयंत्र नेस्तनाबूत करण्याचे काम सतत करत आहेत. त्यांच्या कार्याचा फायदा सरकारला होतो. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न करू.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, धर्म, संस्कृती, पर्यावरण संरक्षण स्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. अपघातावेळी अनेकदा शासनाच्या रुग्णवाहिकेच्या अगोदर संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते, एवढी तत्परता आहे.
प्रारंभी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही मंत्र्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, आम्ही हिंदूंनी एकजुटीने राहिले पाहिजे. इस्राईल-हमास युद्धातून आपल्याला भरपूर शिकायला मिळाले आहे. जे यापासून बोध घेणार नाहीत ते संपणार आहेत. म्हणून मी म्हणत असतो की, ‘हिंदू खतरेमे है’ आपल्याकडे धर्माबद्दल स्वाभिमान कमी आहे. पण थांबलो तर वेळ निघून गेलेली असेल. यहुदी आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली तर काय होईल? म्हणून जातीपातीत वाटले न जाता हिंदूंनी एक व्हावे.
या सोहळ्याचे आभार प. पू. कानिफनाथ महाराज यांनी मानले. श्रद्धा बोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संतपीठावर औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, उद्योजक किरण सामंत, संपादक उल्हास घोसाळकर, उर्मिला घोसाळकर, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राहुल पंडीत, बिपीन बंदरकर उपस्थित होते.