दापोलीतील अपघातामधील जखमींचा खर्च शासन करणार, मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत
By मनोज मुळ्ये | Published: June 26, 2023 01:12 PM2023-06-26T13:12:18+5:302023-06-26T13:15:21+5:30
अपघातातील मृतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली
दापोली : शहरातील आसूद जोशी आळी येथे झालेल्या ट्रक आणि डमडम (प्रवासी रिक्षा) अपघातातील मृतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. या अपघातात आठजण जखमी झाले असून, त्यांच्या उपचारांचा खर्चही शासन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात डमडम चालकासह एकूण आठजणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी सहाजणांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रकृती गंभीर असलेल्या दोघांना मुंबईला हलवण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी अपघाताची माहिती कळताच दापोलीत संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांशी संपर्क साधून चर्चा केली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत करण्याचे जाहीर केले. त्यानुसार अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींवरील उपचाराचा खर्चही सरकार करणार आहे.