मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा, प्रशासनाने दिलेली मुदत संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:39 IST2025-01-24T14:39:41+5:302025-01-24T14:39:54+5:30
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरातील शासनाच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेली ३१९ अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत प्रशासनाने दिलेली मुदत गुरुवारपर्यंत देण्यात ...

मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा, प्रशासनाने दिलेली मुदत संपली
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरातील शासनाच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेली ३१९ अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत प्रशासनाने दिलेली मुदत गुरुवारपर्यंत देण्यात आली हाेती. ही मुदत संपल्याने शुक्रवारी तोडण्यात येणार आहेत. ही बांधकामे तोडण्यासाठी न्यायालयाकडून स्थगिती मिळू नये, यासाठी मत्स्य विभागाकडून न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मिरकरवाडा बंदरातील जेटी परिसरामध्ये शासकीय जागेत ही बांधकामे उभारण्यात आली आहेत. यापूर्वीही मत्स्य विभागाकडून या बांधकामांवर हातोडा उगारण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा ती उभारण्यात आली. या बांधकामांमध्ये मासे मारण्याची जाळी, नौकांचे साहित्य, सुकी-ओली मासळी ठेवण्यात येते. ही बांधकामे अनधिकृत असल्याचा ठपका मत्स्य विभागाने ठेवला आहे. मिरकरवाडा बंदराचा दुसऱ्या टप्प्यात विकास करण्यात येत असल्याने ही अनधिकृत बांधकामे तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी मत्स्य विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.
दरम्यान, ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी मत्स्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला मच्छिमारांनी विरोध केला आहे. या कारवाईमुळे अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त हाेणार असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मात्र, या विरोधाला न जुमानता प्रशासनाने बांधकामे हटविण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने शुक्रवारी ही बांधकामे पाडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
मंत्री नितेश राणे यांनीही घेतला होता आढावा
मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांबाबत आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी या परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कारवाईला गती मिळाली आहे.
साहित्य ठेवण्यासाठी पर्यायी जागेची मागणी
अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार, या भीतीने अनेकांनी तेथील साहित्य अन्यत्र हलविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मासेमारीसाठी आवश्यक असलेले साहित्य कुठे ठेवणार? साहित्य ठेवण्यासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणीही मच्छिमारांकडून होत आहे.
अनधिकृत बांधकामांची यादी
बांधकामे - संख्या
कावन - १४१
पत्राशेड - ८०
पक्की बांधकामे - ३१
पानटपरी - ३३
अर्धपक्के बांधकाम - १२
भेळ गाडी/वडापाव स्टॉल - ११
चहानाष्टा सेंटर - ०४
मोबाइल दुकान - ०५
सलून - ०१
मंदिर - ०१
२३ जानेवारीपर्यंत स्वखर्चाने बांधकामे हटविण्यासाठी मुदत होती