परशुराम घाटातील कठीण कातळ अखेर ९ महिन्यांनी फुटला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 03:26 PM2023-09-07T15:26:40+5:302023-09-07T15:27:38+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणातील तडे बुजवले

The hard shell in Parashuram Ghat finally broke after 9 months | परशुराम घाटातील कठीण कातळ अखेर ९ महिन्यांनी फुटला!

परशुराम घाटातील कठीण कातळ अखेर ९ महिन्यांनी फुटला!

googlenewsNext

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाटातील अतिशय कठीण कातळ फोडण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले. आता कातळ पूर्णपणे फोडण्यात यश आल्यानंतर तेथे रखडलेल्या दुसऱ्या लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरु केले आहे. आता परशुराम घाट ते आरवली दरम्यानच्या ३६ किलोमीटर अंतरात केवळ सव्वा किलोमीटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे.

गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले. जमिनीचा मोबदला व मालकीवरून वाद निर्माण झाल्याने हे काम अडचणीत आले होते. मात्र, आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. घाटातील चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीने याआधीच काम पूर्ण केले. परंतु, खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनी मार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन अनेक दिवस थांबले होते. याठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. मात्र, आता कातळ फोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दुसऱ्या लेनचे काम देखील वेगाने सुरु झाले आहे.

काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील दुसराही मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी आधी पावसाळ्यात महामार्गावर आलेली दरडीची माती हटविण्यात येत आहे. त्यानंतर काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मागील तीन दिवस सातत्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काँक्रिटीकरण पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.

काँक्रिटीकरणातील तडे बुजवले

परशुराम घाटातील माथ्यावरचे काँक्रिटीकरण अत्यंत घाईघाईने पूर्ण करण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसात त्यातील काही भाग खचला. त्यामुळे नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. मात्र, आता पाऊस कमी होताच हे तडे विशिष्ट लिक्विड मटेरियलने बुजविण्यात आले आहेत.
 

Web Title: The hard shell in Parashuram Ghat finally broke after 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.