चिपळुणात गवा रेड्याने रोखला महामार्ग, वाहनचालकांना भरली धडकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:34 PM2024-12-03T16:34:09+5:302024-12-03T16:38:06+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील शहरालगतच्या कापसाळ येथे रविवारी मध्यरात्रीनंतर गवा रेड्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. महामार्गावरच काही वेळ तो थांबल्याने ...
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील शहरालगतच्या कापसाळ येथे रविवारी मध्यरात्रीनंतर गवा रेड्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. महामार्गावरच काही वेळ तो थांबल्याने वाहनचालकांमध्ये धडकी भरली होती. तर स्थानिक नागरिकही घाबरून गेले. महामार्गावर प्रथमच गवा रेड्याचे दर्शन झाले.
चिपळूण शहराला चारही बाजूने जंगलमय डोंगराने वेढले आहे. तीस टक्के डोंगर भागात उतारावर नागरी वस्ती आहे. त्यामागे जंगल परिसर आहे. शहर परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अनेक वेळा निदर्शनास आला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी शहरातील उक्ताड परिसरात जंगलमय असलेल्या डोंगर उतारावरील एका बंद घरामध्ये बिबट्याने शिरकाव केला होता. सहा ते सात वर्षांपूर्वी एक गवा रेडा थेट शहरातून मार्गक्रमण करीत रामतीर्थ स्मशानभूमी मार्गे मुरादपूर, शंकरवाडीदरम्यान निदर्शनास आला होता. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने काही घरांच्या प्रवेशद्वारांची मोडतोड करून गांधारेश्वर नदी परिसरातून महामार्गावर नजीकच्या जंगलमय परिसरात गेल्याचे सांगितले.
शहरातील विंध्यवासिनी देवी मंदिर परिसरातील जंगलात एक बिबट्याची मादी पाच बछड्यांसह आढळली होती. वन विभागाने काही काळ सीसीटीव्ही लावून माणसांचा वावर बंद केला होता. तर लोकवस्तीत मगरींचाही वावर वाढल्याच्या अनेक घटना निदर्शनास आल्या आहेत. आता तर थेट महामार्गावरच एक भला मोठा गवा रेडा कामथे, कापसाळच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास वावरताना निदर्शनास आला. काही काळ या गवा रेड्याने वाहनचालकांच्या मनात धडकी भरवली. महामार्ग ओलांडून महामार्गावरील बॅरिकेटस्वरून उडी मारून नजीकच्या जंगलात हा रेडा निघून गेला. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून हाते आहे.