रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:08 PM2024-05-27T12:08:17+5:302024-05-27T12:08:42+5:30

९१ गावांमधील २२८ वाड्यांमध्ये टंचाई

the intensity of water scarcity started to increase In Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा हाेती. मात्र, पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये अजून वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ९१ गावांमधील २२८ वाड्यांतील ५६,६७० ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टंचाईग्रस्त भागात केवळ २४ टँकरने दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६१ गावांमधील १५८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत हाेती. मात्र, दुसऱ्याच आठवड्यामध्ये टंचाईची भीषणता वाढल्याने ही संख्या २२८ वाड्यांवर गेली आहे. प्रत्येक दिवशी टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडत असल्याने प्रशासनालाही पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.

तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नद्या, नाल्यांसह विहिरी, विंधन विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी, ग्रामस्थांना टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ४ शासकीय आणि २० खासगी टँकर धावत आहेत. शासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठाही अपुरा असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. अनेक वाड्यांमध्ये विकतचे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

टंचाईग्रस्त गावे, वाड्या

तालुका -गावे वाड्या - टँकर
मंडणगड - १ - १ - १
दापाेली - १२ - १६ - १
खेड - १५ - ४२ - १
चिपळूण - १६ - ३५ - १
गुहागर - २ - ३ - १
संगमेश्वर - १९ - ३२ - १
रत्नागिरी - १३ - ८२ - १३
लांजा - ४ - ६ - १
राजापूर - ९ - ११ - ३


टंचाईग्रस्त गावे

लांजा- पालू, हर्दखळे, कोचरी, कुरंग

चिपळूण- कोंडमळा, कादवड, कळकवणे, सावर्डे, नादखेरकी, करंबवणे, कुडूप, टेरव, अडरे, आगवे, अनारी, डेरवण, डेरवण खुर्द, पेढांबे, गुढे.

खेड- देवसडे, दिवाणखवटी, फुरुस, कुळवंडी, तळे, तुळशी बुद्रूक खु, चिंचवली, घेरारसाळगड, खवटी, आस्तान, चाटव, कशेडी, सवणस, चिरणी खोपी कळंबणी बु.

दापोली- उटंबर, आतगाव, केळशी, ओणनवसे, तामसतीर्थ, उन्हवरे, आडे, पणदेरी, कुडावळे, पांगारी तर्फ हवेली, आंजर्ले, महामाईनगर.

संगमेश्वर- पाचांबे, काटवली, ओझरखोल, कुटगिरी, विघ्रवली, कोंडओझरे, शेनवडे, बेलारे खुर्द, कोळंबे, वायंगणे, मासरंग, तळवडे तर्फ देवरुख, मुचरी, निवे खुर्द, निवळी, असुर्डे, मिरकोंड, साखळकोंड, पेढांबे.

मंडणगड- भोळवली.

राजापूर- ओणी, ओझर, वडवली, वडदहसोळ, दोनिवडे, कोंड्ये, सौंदळ, तळगाव, देवाचे गोठणे, प्रिंदावण.

गुहागर- धोपावे, सडेजांभारी.

रत्नागिरी- शिरगाव, भाट्ये, नाचणे, सडामिऱ्या, केळ्ये, सोमेश्वर, गोळव, उक्षी, कळझोंडी, खेडशी, वरवडे, जांभारी.

Web Title: the intensity of water scarcity started to increase In Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.