दिवसा घरी अन् रात्री निवारा केंद्रावर!, चिपळुणात कायमस्वरूपी स्थलांतराचा प्रश्न
By संदीप बांद्रे | Published: August 1, 2023 04:41 PM2023-08-01T16:41:55+5:302023-08-01T16:44:32+5:30
प्रशासनासमोर तालुक्यातील १३ गावांमधील १२२३ लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न
चिपळूण : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी - ठाकूरवाडी आदीवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याची घटना घडल्यानंतर तालुक्यातील १३ गावांमधील १२२३ लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यातील ७१ जणांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. काहीजण दिवसा घरी आणि रात्री जिल्हा परिषद शाळेत सुरू केलेल्या निवारा केंद्रावर वस्ती करीत आहेत. तीन गावामध्ये काही कुटुंब तात्पुरती स्थलांतरित झाली असली, तरी उर्वरित १० गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.
दरडीचा धोका असलेल्या १३ ग्रामपंचायत परिसरातील ३६ वाड्यांमधील ३४१ कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.येथील लोकांचे तात्पुरते पुर्नवसन होण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा व काही समाज मंदिरांमध्ये २६ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. परंतु एक दोन गावांमध्येच स्थलांतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी संभाव्य धोका आहे अशा ठिकाणी जाऊन अधिकारी स्थानिकांना स्थलांतरित होण्यासाठी समजूत घालत आहेत. परंतु तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर होण्यास कोणीच तयार नसल्याचे देखील समोर येत आहे.
चिपळूण मधील परशुराम घाटात दरडीचा धोका कायम आहे. येथे डोंगरावर परशुराम गाव, तर डोंगराच्या पायथ्याशी पेढे गाव वसलेले आहे. २०२१ साली अतिवृष्टीमुळे पेढे गावातील काही घरावर दरड कोसळली होती. त्यामध्ये तिघांचा मृत्यू देखील झाला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती आहे. त्याचे सर्वेक्षण देखील प्रशासनाकडून करण्यात आले असून स्थानिकांना स्थलांतराच्या नोटिसा देखील देण्यात आले आहेत. पावसाळी काळात चार महिन्यासाठी स्थलांतरित करता यावे यासाठी २५ पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात १८, तर शहरी भागात ७ पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
तूर्तास तालुक्यातील २१ कुटुंबातील ७१ जणांचे स्थलांतर केले आहे. यामध्ये कादवड धनगर वाडीतील ८ कुटुंबांमधील १९ जणांपैकी ६ जण खेर्डी येथे नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित १३ जण गावच्या जिल्हा परिषद शाळेत केवळ रात्रीच्या वेळी वस्ती करतात आणि दिवसा घराकडे राहतात. कोळकेवाडी मधील १८ जणांपैकी १० जण नातेवाईकांकडे राहतात. तसेच येगाव सुतारवाडी व ठोकबावमधील १० कुटुंबातील ४२ जण जिल्हा परिषद शाळेत वास्तव्य करीत आहेत. उर्वरित १० गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.
या गावातील ग्रामस्थांना नोटीस
पेढे कुभांरवाडी, परशुराम घाटमाथा, तिवरे येथील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंदफणसवाडी, भेंद-धनगरवाडी, कुंभारवाडी, गंगेचीवाडी. तिवडीतील राळेवाडी, उगवत वाडी, भटवाडी. रिक्टोली येथील इंदापुर वाडी, मावळतवाडी, गावठाणवाडी, मधलीवाडी, बौध्दवाडी, देऊळवाडी. नांदिवसे मधील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी, बावलाई धनगरवाडी. कादवड धनगरवाडी, ओवळी येथील काळकाई - धनगरवाडी, धामनदी - धनगरवाडी, बुरंबवणेवाडी, खेंड- धनगरवाडी. कळकवणे येथील रांगी धनगरवाडी, खलीफा धनगरवाडी. कोळकेवाडी मधील खारवार- धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी, बोलाडवाडी. पिंपळी बुद्रुक, कुभार्ली येथील लांबेवाडी, पेढांबेतील दाभाडी, रींगी धनगरवाडी. येगाव येथील ढोकबाव सुतारवाडी. कळंबट गवळीवाडी आणि गोवळकोट बौद्दवाडी व मोहल्ला.