लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसला बिबट्या, ग्रामस्थांनी लावले पळवून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:41 PM2022-03-24T18:41:31+5:302022-03-24T18:41:53+5:30
रत्नागिरी तालुक्यातील भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले हाेते.
रत्नागिरी : तालुक्यातील भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत मंगळवारी (२२ मार्च) बिबट्या शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. प्रेम मायंगडे यांच्या लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले हाेते. एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या बिबट्याला जंगलाकडे पळवून लावण्यात ग्रामस्थांना यश आले.
भोके मायंगडेवाडीतील ग्रामस्थ रंगपंचमी खेळून घरी परतले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाज आला. मात्र, ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वस्तीच्या मध्यभागी लाकडे ठेवण्याच्या छोटीशा खोपीत (खोली) बिबट्या लपून बसला होता. डरकाळ्यांच्या आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी शोध सुरु झाला.
बॅटरीच्या उजेडात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. वस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती गावात पसरताच संपूर्ण गाव बिबट्याला पाहण्यासाठी जमा झाला हाेता. अडचणीची जागा असल्यामुळे काहीच करता येत नव्हते, त्यातच काळाेखामुळे बिबट्या अंगावर उडी मारण्याचीही भीती हाेती.
बिबट्याला पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न सुरु केले. अखेर सुमारे एक तासांनी हा बिबट्या एका ग्रामस्थाच्या अंगणाच्या दिशेने उड्या मारत पळून गेला. त्याच्या पाठून अवघा गाव धावला.
वस्तीत कधीच घुसला नव्हता
पंधरा दिवसांपूर्वी गावातील श्वान गायब होत होते. आजपर्यंत कधीच बिबट्या गावात शिरला नव्हता. पहिल्यांदाच गावात बिबट्या शिरल्याचे प्रेम मायंगडे यांनी सांगितले. या बिबट्याला माेबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रबद्द करण्यासाठी तरुणांची धावपळ उडाली हाेती. काळाेखामध्येही तरुण बिबट्याचे चित्रीकरण करत हाेते.