रत्नागिरीतील मुख्य रस्त्याचे १०० कोटींतून होणार काँक्रिटीकरण
By शोभना कांबळे | Published: December 6, 2023 04:31 PM2023-12-06T16:31:26+5:302023-12-06T16:31:43+5:30
शहर आणि परिसरातील १२५ कोटींच्या विकासकामांना १७ रोजी प्रारंभ
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या रत्नागिरी शहरातील विकासकामांचा शुभारंभ येत्या १७ डिसेंबर रोजी नगरपालिका करणार आहे. यात प्रमुख १७ कामांचा समावेश आहे. यात नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा समावेश असून, त्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. अनेक कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
नगरोत्थान योजनेतून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ९६.९९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, तसेच थिबा पॅलेस येथील थ्रीडी मॅपिंग मल्टी मीडिया शो (खुले नाट्यगृह) यासाठी २० काेटी आणि रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या कामालाही प्रारंभ झाला असून, त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचबरोबर नाट्यगृहाच्या पाठीमागील खाऊ गल्ली चांगल्या प्रकारे विकसित करण्यात येणार आहे, तसेच शहरातील जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरण, तसेच उद्यानाशेजारील खाऊ गल्लीही विकसित होणार आहे. यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रत्नदुर्ग किल्ला येथे शिवसृष्टी विकसित करणे, तेलीआळी येथे उद्यान उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची दुरुस्ती, तसेच मागील बाजूला असलेल्या भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम आदी विकासकामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होणार आहेत.
नगरोत्थान योजनेतून कोकण विभागातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने सन्मानित असलेल्या मान्यवरांच्या प्रतिकृतींचे सुशोभीकरण, ध्यान केंद्राचे बांधकाम, तारांगणशेजारील शिर्के उद्यानाचे सुशोभीकरण, शहरात विठ्ठलमूर्ती उभारण्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम करणे, सभोवतालचा परिसर सुशोभीकरण करणे, ही कामे होणार आहेत.
यापैकी तारांगण आणि विठ्ठलमूर्ती चबुतरा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट यांच्याकडे सव्वाकोटीचा निधी वर्ग करण्यात आल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. या सर्व कामांचा शुभारंभ येत्या १७ डिसेंबर राेजी करण्यात येणार आहे.
चिपळूण घरपट्टी कार्यवाहीला स्थगिती
चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीतील काही मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टी आकारणी केली जात आहे. याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, घरपट्टी आकारणीवरून नागरिकांमध्ये गैरसमज झाला आहे. याबाबत बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. जनतेच्या भावनांचा विचार करून घरपट्टी कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.