लग्न घरच्यांनी ठरवलं, अन् ‘ट्युनिंग’मुळे प्रेम आपोआप वाढलं; रत्नागिरी जि.प.च्या सीईओंची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
By मेहरून नाकाडे | Published: February 14, 2023 01:43 PM2023-02-14T13:43:43+5:302023-02-14T13:44:31+5:30
एकमेकांवरील दृढ विश्वास, पाठिंबा यामुळे ॲरेंज मॅरेज असले तरी प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, नोकरीही मिळाली. त्यामुळे घरच्यांनी लग्नाची घाई केली. वडिलधाऱ्यांच्या पसंतीने ‘साैम्याश्री’ यांच्याशी लग्न झाले. लग्नाला सात वर्षे झाली. संसाराच्या वेलीवर फूल उमलले. चार वर्षांच्या ‘अर्ना’मुळे आमच्या जीवनात आनंदाचा महापूरच आला. दोघांची क्षेत्र भिन्न आहेत, मात्र एकमेकांवरील दृढ विश्वास, पाठिंबा यामुळे ॲरेंज मॅरेज असले तरी प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले. ‘व्हॅलेंटाईन दिना’चे औचित्य साधून ‘लोकमत’ ने साधलेल्या संवादात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
विजयनगर जिल्ह्यात (कर्नाटक) माझे गाव. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, मला नोकरीही मिळाली, घरच्यांच्या संमतीने लग्नही झाले; परंतु ‘आयएएस’ व्हायची मनीषा होती. मी माझी इच्छा पत्नीपुढे व्यक्त केली. तिने पाठिंबा दर्शविला. मी नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. वास्तविक माझा प्रशासकीय विषयांकडे कल तर तिला सांस्कृतिक क्षेत्राची विशेष आवड. तिने एमबीए केले आहे. अभ्यासात मला तिची विशेष मदत झाली. पास झालो त्यावेळी तर तिचा आनंद औरच होता.
आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करतो, विचार व्यक्त करतो. तिला गायन, नृत्याची आवड आहे. त्यामुळे मी तिच्या आवडीला नेहमीच प्रोत्साहन देतो. तिच्या संकल्पना मला कामात उपयुक्त ठरतात. कार्यक्रमाचे आयोजनात तर तिचे मार्गदर्शन परफेक्ट असते. त्यामुळे ॲरेंज मॅरेज असले तरी लग्नानंतर आमचे प्रेम बहरतच गेले. कुटुंबीयांचा आम्हाला वेळोवेळी पाठिंबा लाभलाच; परंतु पत्नीची साथ महत्त्वाची ठरली आहे. मुलगी लहान आहे, तिचे संगोपन व काैटुंबिक सर्व जबाबदाऱ्या ‘साैम्याश्री’ नेटकेपणाने पार पाडते. दोघांची क्षेत्र भिन्न असली तरी एकमेकांवरील सार्थ विश्वासच आमची प्रेमाची गाडी पुढे नेण्यास उपयुक्त ठरत आहे. घरातील वातावरण आनंददायी, प्रसन्न ठेवण्यात पत्नीचा वाटा मोठा असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी सांगितले.
आनंददायी सहजीवन
व्हॅलेंटाईन दिनाचे एक दिवसापुरते महत्त्व न राहता पती-पत्नीचे नाते कायमच आनंदी, प्रेमळ, निकोप असावे, असे माझे मत आहे. आमची क्षेत्र भिन्न असली तरी एकमेकांना आम्ही पाठिंबा देतो. ‘सरस’ आयोजनात तिची संकल्पना उपयुक्त ठरली. जिल्हा परिषद स्नेहसंमेलनात सामूहिक नृत्यात सहभागी होत, गायनही सादर केले.