‘आम्ही रत्नागिरीकर’ची सभा सामंत समर्थकांनी उधळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:16 IST2024-07-29T13:15:43+5:302024-07-29T13:16:05+5:30
रत्नागिरी : शहरातील खड्ड्यांसह अन्य समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून रत्नागिरीकरांनी आयाेजित केलेल्या बैठकीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या ...

‘आम्ही रत्नागिरीकर’ची सभा सामंत समर्थकांनी उधळली
रत्नागिरी : शहरातील खड्ड्यांसह अन्य समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून रत्नागिरीकरांनी आयाेजित केलेल्या बैठकीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी ताबा घेत सभाच उधळून लावल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. मंत्री सामंत यांनी किती काेटींची विकासकामे केली, याचा पाढा वाचत यापुढे पालकमंत्र्यांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराही दिला.
रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. हे खड्डे बुजवावेत, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आंदोलने करून नगर परिषद प्रशासनाला सुनावले होते. यानंतर ‘आम्ही रत्नागिरीकर’च्या माध्यमातून शहरातील सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काही नागरिकांनी रविवारी सायंकाळी एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिलिंद कीर यांच्यासह विजय जैन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ही सभा सुरू असतानाच सामंत समर्थक आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा सुर्वे, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, विजय खेडेकर, बंटी कीर, सुहेल मुकादम यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीच्या ठिकाणी आले. त्यांनी बैठकीचा ताबा घेत मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरात आणि तालुक्यात कोणत्या प्रकारची विकासकामे केली आहेत, याचा पाढाच वाचला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले हाेते. यावेळी पालकमंत्री सामंत यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी जोरदार घोषणाबाजीही केली.
बैठकीत गाेंधळ हाेताच मिलिंद कीर व विजय जैन यांच्यासह काही नागरिक घटनास्थळावरुन निघून गेले. तसेच काही नागरिक बैठकीच्या ठिकाणी एका बाजूला शांतपणे उभे हाेते. सामंत समर्थकांनी ही बैठक उधळून लावल्याने रत्नागिरीत नवीन राजकीय वादाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जशाच तसे उत्तर देऊ
यापुढे विविध समाजमाध्यमांवर पालकमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात कोणी काही बोलल्यास आणि वारंवार बदनामी केल्यास सहन केले जाणार नाही तसेच यापुढे बदनामी करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला.