मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची उद्या पुन्हा मंत्र्यांकडून पाहणी
By मनोज मुळ्ये | Published: September 5, 2023 06:00 PM2023-09-05T18:00:56+5:302023-09-05T22:05:28+5:30
गणेशाेत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याचे आश्वासन
रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरण कामांतर्गत गणेशाेत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. या आश्वासनानंतर त्यांनी वारंवार महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दाैरे आयाेजित केले. आता पुन्हा ते या महामार्गाच्या कामाची पाहणी करणार असून, बुधवार, ६ सप्टेंबर राेजी दाैरा करणार आहेत.
महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विराेधी पक्षांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यातच रखडलेले काम आणि महामार्गावर पावसाळ्यात पडलेले खड्डे यामुळे साेशल मीडियावरही खिल्ली उडविण्यात आली. ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडलेला हे काम चांगलेच चर्चेत राहिले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. पावसाळ्यातही हे काम सुरू ठेवून लवकरात लवकर महामार्ग पूर्णत्वाला नेण्याचे त्यांनी निर्देश दिले हाेते. त्यानंतर त्यांनी वारंवार या महामार्गाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे.
गणेशाेत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याची सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली हाेती. त्यानुसार महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ते बुधवारी पाहणी दाैरा करणार आहेत.
बुधवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० ते ३ वाजता पॅकेज ८ तळगाव ते वाकेड या ३५ किमीची पाहणी, दुपारी ३ ते ३:४५ वाजता पॅकेज ७ वाकेड ते कांटे ५१ किमी, दुपारी ३:४५ वाजता ते ४:३० वाजता पॅकेज ६ कांटे ते आरवली ४० किमी, दुपारी ४:३० वाजता ते सायंकाळी ५ वाजता पॅकेज ५ आरवली ते चिपळूण या २५ किमी, सायंकाळी ५ ते ५:३० वाजता चिपळूण ते परशुराम घाट ११.४० किमी, सायंकाळी ५:३० ते ६:३० वाजता पॅकेज ४ परशुराम घाट ते कशेडी घाट ४२.३० किमी, सायंकाळी ६:३० ते ७ वाजता पॅकेज ३ कशेडी घाट ते भोगाव खुर्द या १३ किमी रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहेत.