दापोलीत एलियनसदृश कातळशिल्पाचे गूढ, 'या' कातळशिल्पाचा विशेष अभ्यास केला जाणार
By मनोज मुळ्ये | Published: May 22, 2024 05:57 PM2024-05-22T17:57:31+5:302024-05-22T17:57:52+5:30
दापोलीत आढळलेले हे कातळशिल्प आजपर्यंतच्या शिल्पांपेक्षा वेगळे
शिवाजी गोरे
दापोली : तालुक्यातील उंबर्ले गाढवाचा खडक येथे सुमारे पाच हजार ते वीस हजार वर्षांपूर्वीचे कातळशिल्प असल्याचा दावा अभ्यासक टीमचे निसर्ग यात्री संस्थेचे अध्यक्ष सुधीर रिसबुड यांनी केला आहे. एलियनसदृश हे कातळशिल्प असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिसबुड तसेच बंगळुरू आयआयटीएन प्रवर्तक सुनीता दबडगावे, बंगळुरू आयआयटीएन प्रवर्तक व निसर्ग यात्री संस्थेचे सदस्य तार्किक खातू या अभ्यासकांनी उंबर्ले येथील शिल्पाची पाहणी केली. हे शिल्प कोणत्या कालखंडातील आहे यावर अभ्यास केला जाणार आहे. लवकरच त्याचे रहस्य उलगडू, असा विश्वास रिसबुड यांनी व्यक्त केला. दापोलीत आढळलेले हे कातळशिल्प आजपर्यंतच्या शिल्पांपेक्षा वेगळे आहे. या कातळशिल्पाचा विशेष अभ्यास केला जाणार असून, संशोधकाची टीम या ठिकाणी येऊन गेल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या परिसरात सुमारे दोन हजार कातळशिल्पांचा अभ्यास केला जात आहे. मात्र उत्तर रत्नागिरी भागात नुकतेच दापोली, मंडणगड आणि गुहागर या तीन तालुक्यात आढळलेल्या प्राचीन कातळशिल्पांमुळे मोठे रहस्य उलगडणार आहे.
दापोली तालुक्यातील उंबर्ले येथील गाढव खडक या भागात एलियनसदृश कातळशिल्प आढळले आहे. या कातळशिल्पाच्या जवळपास पाळीव प्राण्यांची कातळशिल्पे आहेत. या परिसरात अजून काही कातळशिल्प असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोकणातील कातळशिल्पाचा अभ्यास बंगळुरू आयआयटी हैदराबाद आयटी येथील संस्थेमार्फत केला जात आहे. ही कातळशिल्प नेमकी कोणत्या काळातील आहेत. या कातळशिल्पामागील रहस्य नेमके काय आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. - सुधीर रिसबुड, अध्यक्ष निसर्ग यात्री संस्था