Ratnagiri: ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ वाढले, व्हिसेराची प्रतीक्षा; सवतसडा धबधब्यात सापडला होता मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:40 PM2023-12-08T12:40:57+5:302023-12-08T12:41:15+5:30

चिपळूण : येथील सवतसडा धबधब्याच्या खडकात चैतन्या मेटकर या विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला हाेता. मात्र, हा घातपात की, आत्महत्या ...

The mystery of the death of Chaitanya Metkar, who was found dead in the rocks of the Savatsada waterfall has increased | Ratnagiri: ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ वाढले, व्हिसेराची प्रतीक्षा; सवतसडा धबधब्यात सापडला होता मृतदेह

Ratnagiri: ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ वाढले, व्हिसेराची प्रतीक्षा; सवतसडा धबधब्यात सापडला होता मृतदेह

चिपळूण : येथील सवतसडा धबधब्याच्या खडकात चैतन्या मेटकर या विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला हाेता. मात्र, हा घातपात की, आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. पोलिसांना आता व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा असून, व्हिसेरा अहवाल प्राप्त होताच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणातील एका कामगाराला सोमवारी (४ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता परशुराम सवतसडा येथील धबधब्याच्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह दिसला. प्रथमदर्शनी मृतदेहाचे केवळ पाय बाहेर दिसत होते. तर शरीर खडकात कोंबलेल्या अवस्थेत हाेते. पाेलिस तपासानंतर हा मृतदेह पेढे पायरवाडी येथील चैतन्या चंद्रकांत मेटकर या विवाहितेचा असल्याचे स्पष्ट झाले. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला हाेता.

मृतदेहावर काही किरकोळ जखमा आहेत. त्यामुळे ती पाय घसरून खडकात पडली असावी आणि नंतर तिला उठताच आले नसावे, असाही कयास लावला जात आहे. मृतदेहाच्या ठिकाणी हातातील बांगड्या फुटून पडलेल्या स्थितीत आढळल्या हाेत्या. त्यामुळे नेमके काय झाले, प्रत्यक्षात ती धबधब्याच्या ठिकाणी का गेली होती, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.

चैतन्या मेटकर या विवाहितेच्या मृत्यूचे नेमके कारण समाेर न आल्याने पाेलिसही काेणत्याच निष्कार्षापर्यंत पाेहाेचलेले नाहीत. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून मृत्यूचे कारण पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुणे येथे तपासणीसाठी पाठवलेल्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे मूळ कारण समाेर येणार आहे.

माेबाइल घरातच

चैतन्या ही आपल्या सासरच्या लोकांबरोबर येथे राहत होती. तिचा पती मुंबई येथे नोकरीला आहे. मृत्यूच्या एक दिवस अगोदर माहेरला जाते, असे सांगून ती घरातून निघाली होती. विशेष म्हणजे आपला मोबाइल तिने घरातच ठेवला होता. माहेरला जाताना तिने मोबाइल सासरी का ठेवला, याचा शाेध पाेलिस घेत आहेत. पोलिसांनी सर्व शक्यतांची पडताळणी करून तपासला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: The mystery of the death of Chaitanya Metkar, who was found dead in the rocks of the Savatsada waterfall has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.