रत्नागिरीत राणे-सामंत फलकयुद्ध आणखी पेटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:47 PM2024-06-17T12:47:04+5:302024-06-17T12:51:28+5:30
विधानसभेसाठी इशारा
रत्नागिरी : ‘वक्त हमारा भी आयेगा’ असा उघड-उघड इशारा देणारा उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचे छायाचित्र असलेला फलक कणकवलीमध्ये झळकला आणि त्यातून शिंदेसेना विरुद्ध भाजप किंबहुना सामंत विरुद्ध राणे, असे फलकयुद्ध सुरू झाले आहे. आता हे फलकयुद्ध रत्नागिरीतही आले असून, सामंत यांनी कणकवलीत फलक लावल्यानंतर आता उदय सामंत यांच्या गावात पाली येथे खासदार नारायण राणे यांचे छायाचित्र असलेला फलक झळकला आहे. त्यामुळे हे फलकयुद्ध आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
‘झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेलाही आता हैं’ असा इशारा देणारा खासदार नारायण राणे यांचा फलक थेट मंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर केवळ याच विषयाची चर्चा समाज माध्यमांवर आणि लोकांमध्ये सुरू होती.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य न मिळाल्याने खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या कामाबाबत काहीशी खंत व्यक्त केली होती. महायुतीमधील घटक पक्षांनी योग्य पद्धतीने काम केले नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी उदय सामंत तसेच किरण सामंत यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी निवडणुकीत अपेक्षित काम न केल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर शनिवारी कणकवलीमध्ये मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे छायाचित्र असलेला एक फलक शिंदेसेना कार्यालयाबाहेर झळकला. ‘वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असा इशारा या फलकातून देण्यात आला होता. राणे यांना त्यांच्या घरच्या मैदानावरच, असा इशारा देण्यात आल्याने राणे यांच्याकडूनही त्याला उत्तर देण्यात आले, ‘आमची वेळ आली होती, तुमची वेळ येऊ देणार नाही’ असा फलक नितेश राणे यांच्या छायाचित्रासह तेथे झळकला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन फलक झळकल्यानंतर आता हे लोण रत्नागिरीमध्येही आले आहे. रविवारी सकाळी मंत्री उदय सामंत यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच पाली येथे त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खासदार नारायण राणे यांचे छायाचित्र असलेला फलक झळकला आहे. ‘बाप तो बाप होता हैं’ या ठळक शीर्षकाखाली ‘झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेलाही आता हैं’ असे म्हटले आहे. निवडणूक निकालानंतर राणे आणि सामंत सुरू झालेले हे शीतयुद्ध आता थेट रस्त्यावर येऊ लागले आहे.
विधानसभेसाठी इशारा
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य न मिळाल्यामुळे त्याला जबाबदार धरून मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका सुरू झाली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी राजापूर आणि रत्नागिरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर भाजप दावा करेल, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटवण्याची तयारी नीलेश राणे यांनी केल्याचे यातून दिसत आहे.
जुन्या वादाला नवे रूप
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नीलेश राणे काँग्रेसकडून उमेदवार होते. त्यावेळी उदय सामंत राष्ट्रवादीमध्ये होते. मात्र, आघाडी असतानाही उदय सामंत यांनी आपल्यासाठी काम केले नाही, असा नीलेश राणे यांचा आक्षेप होता. तेव्हापासूनच सामंत विरुद्ध राणे, असा सामना मध्ये-मध्ये रंगत होता. मात्र, आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राणे आणि सामंत कुटुंबीय एकत्र भेटले आणि त्यांनी जुन्या वादाला पूर्णविराम दिला. अर्थात त्यानंतरही त्यांच्यातील वाद शमला नसल्याचे या फलकयुद्धातून दिसत आहे.