परशुराम घाटातील संरक्षक भिंतींवर 'कोकण' अवतरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 05:56 PM2024-01-10T17:56:29+5:302024-01-10T17:57:28+5:30

परशुराम घाटातील दुसरी लेन येत्या काही दिवसांत वाहतुकीस खुली केली जाणार

The nature beauty of Konkan painted on the protective wall at Parashuram Ghat | परशुराम घाटातील संरक्षक भिंतींवर 'कोकण' अवतरले!

परशुराम घाटातील संरक्षक भिंतींवर 'कोकण' अवतरले!

चिपळूण : मुंबई-गाेवा महामार्गावरील परशुराम घाटातील  दुसऱ्या लेनचे काम अखेर पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे अद्याप सुरु असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. परंतु आता परशुराम घाटातील उंचच उंच असलेल्या संरक्षक भिंतीवर कोकणच्या निसर्ग सौंदर्य चित्रांद्वारे रेखाटले जात आहे. त्यामुळे घाटातून ये जा करणारे प्रवासी या चित्रांकडे आकर्षित होत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली 17 वर्षे रखडले. ‘नकटीच्या लग्नात सतरा विघ्नं’ याप्रमाणे हे काम अजूनही पूर्णत्वास जात नाही. परशुराम घाटात तर अनेक अडथळ्यांचे डोंगर उभे राहिले. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच टेकडीवर आणि दरीच्या पायथ्याला नागरी वस्ती आहे. पावसाळ्यात दोन्ही बाजूने दरडी कोसळत असल्याने परशुराम घाटातील वाहतूक धोकादायक झाली होती. येथील डोंगर कटाईचे काम तीन ते चार वर्षे सुरू होते. तरीही हे काम सुरू असताना अपघात होऊन दोघांचा जीव गेला होता.

परशुराम घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणचा कातळ फोडण्यातच बराचसा कालावधी निघून गेला. या ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेली दरड हटविण्याचे कामही अनेक दिवस सुरु होते. ही संपूर्ण दरड हटवून लगतच्या डोंगर कटाईचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर आता आवश्यक तेथे संरक्षक भिंत उभारून परशुराम घाटातील दुसरी लेन येत्या काही दिवसांत वाहतुकीस खुली केली जाणार आहे.

दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यापाठोपाठ आता संरक्षक भिंतीवर पेंटिंगद्वारे कोकणचा निसर्ग सौंदर्य रेखाटला जात आहे. समुद्र किनारा, किनाऱ्यावरील बोटी, भात शेती, नांगरणी, सुवार, मासेमारी अशा पद्धतीचे चित्र रेखाटून कोकणचा निसर्ग सौंदर्य संपुर्ण घाटात उभा केला जात आहे. मुंबईतील एका आर्ट एजन्सी मार्फत हे काम सुरू आहे.

Web Title: The nature beauty of Konkan painted on the protective wall at Parashuram Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.