Ratnagiri: तीन नक्षलवादी आलेत, फोन येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून शोध घेतला; मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:36 PM2024-11-08T12:36:49+5:302024-11-08T12:38:23+5:30
मंडणगड : दुधेरे आदिवासीवाडी येथे तीन नक्षलवादी आले असून, विस्फाेटक द्रव्य असल्याची माहिती मिळताच मंडणगड पाेलिसांची धावपळ उडाली. मिळालेल्या ...
मंडणगड : दुधेरे आदिवासीवाडी येथे तीन नक्षलवादी आले असून, विस्फाेटक द्रव्य असल्याची माहिती मिळताच मंडणगड पाेलिसांची धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून नक्षलवाद्यांचा शाेध घेतला. मात्र, पाेलिसांच्या हाती काहीच लागले नाही. तर हा फाेन करणारा मद्यपी असल्याचे समाेर आले. याप्रकरणी पाेलिसांना खाेटी माहिती दिल्याप्रकरणी मद्यपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौजे दुधेरे आदिवासीवाडी येथून एकाने रत्नागिरी पाेलिस नियंत्रण कक्षात मदत हेल्पलाइन नंबरवर फाेन केला. त्यावर दुधेरे आदिवासावाडी येथे तीन नक्षलवादी आले आहेत. त्यांच्याकडे विस्फोटक द्रव्य आहेत, अशी माहिती दिली. ही माहिती मंडणगड पोलिसांना देण्यात आली.
मंडणगडचे पाेलिसही तात्काळ दुधेरे आदिवासीवाडी पाेहाेचले. तिथे खात्री केल्यावर ती व्यक्ती त्याची पत्नी व मुलाबरोबर त्याच्या सासुरवाडीत मौजे दुधेरे आदिवासीवाडी येथे राहत असल्याचे पुढे आले. याच घरात नक्षलवादी असल्याचे व त्यांच्याकडे विस्फोटक द्रव्य असल्याचे सांगितले हाेते. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण घर व घराबाहेरील परिसर, आजूबाजूचा परिसर तपासला. मात्र, पाेलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता असे काहीही घडले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दारूच्या नशेत या व्यक्तीने हा फाेन केल्याचे पुढे आले आहे. पाेलिसांनी चुकीची व खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी पाेलिसांनी मद्यपी विराेधात गुन्हा दाखल केला आहे.